भाजपने 33 जागांवर व्होट जिहाद रोखण्यासाठी आखली व्यूहरचना:एकापेक्षा अधिक मुस्लिम उमेदवार रिंगणात
राज्यात २०% च्या वर मुस्लिम लोकसंख्या असलेले ३३ विधानसभा मतदारसंघ आहेत. तेथे व्होट जिहादचा भाजपला थेट मोठा फटका बसू शकतो. तो टाळण्यासाठी मुस्लिम मतविभाजनाची भाजपने व्यूहरचना केल्याची माहिती एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. या मतदारसंघांमध्ये जिंकायचे असेल तर मतविभाजन हा एकमेव पर्याय उरतो. अशा वेळी तिथे वेगवेगळ्या माध्यमातून अपक्ष म्हणून एकापेक्षा अधिक मुस्लिम उमेदवार उभे करणे हाच पर्याय आहे, असे या पदाधिकाऱ्याने सांगितले. २०११ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी ११.५४ टक्के म्हणजे १ कोटी ३० लाख आहेत. उत्तर कोकण, खान्देश, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात मुस्लिम मतदार बहुसंख्येने आहेत. धुळे, छत्रपती संभाजीनगर, मुंबईतील भिवंडी, नांदेड, परभणी, लातूर, वाशिम, अकोला, ठाणे, रायगड, बाळापूर या लोकसभांमध्ये मुस्लिम मतदार अधिक आहेत. त्यामुळे धुळे शहर, सिंदखेडा, शिरपूर, चोपडा, रावेर, अकोला पूर्व, तिवसा, अचलपूर, नागपूर मध्य, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, परभणी, छत्रपती संभाजीनगर पूर्व, मध्य, मालेगाव मध्य, भिवंडी पश्चिम, पूर्व, मुंब्रा-कळवा, चारकोप, वर्सोवा आदी ३३ मतदारसंघात एकापेक्षा अधिक मुस्लिम उमेदवार असावेत, असा भाजपने प्रयत्न केला आहे.