भाजपच्या पहिल्या यादीत 13 महिलांना उमेदवारी:भोकरमधून अशोक चव्हाणांच्या कन्येला तिकीट तर 8 विद्यमानांना पुन्हा संधी

भाजपने आज आपली 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक ठिकाणी विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली तर काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत 13 मतदारसंघात महिलांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये फुलंब्री, चिखली, जिंतूर, बेलापूर, पर्वती, गोरेगाव, शेवगाव, श्रीगोंदा, केज, नाशिक पश्चिम, कल्याण पूर्व, दहिसर आणि भोकर मतदारसंघाचा समावेश आहे. यापैकी 8 महिला या विद्यमान आमदार आहेत अशोक चव्हाण यांच्या कन्येला तिकीट
भोकरमधून श्रीजया चव्हाण यांना भाजपने विधानसभेचे तिकीट दिले आहे. श्रीजया चव्हाण या माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडचिट्ठ देत कमळ हाती घेतले होते. त्यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. तर आता विधानसभेला त्यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांचा राजकीय वारसा आता त्यांच्या कन्या श्रीजया चव्हाण या पुढे नेणार आहेत. श्रीजया चव्हाण या राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या होत्या. त्याचवेळी त्यांच्या खऱ्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. कल्याण पूर्वमधून सुलभा गायकवाड
सुलभा गायकवाड या कल्याण पूर्वचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी आहेत. गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहराध्यक्ष महेश गायकवाड यांच्यावर जमिनीच्या वादातून गोळीबार केला होता. उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यात ही घटना घडली होती. या प्रकरणी आमदार गणपत गायकवाड सध्या तुरुंगात आहेत. भाजपने त्यांचे तिकीट कापले असले तरी त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी तिकीट देण्यात आले आहे. दरम्यान, भाजपने विद्यमान आमदार गणपत गायवाड किंवा कुटुंबातील सदस्यांना तिकीट दिले तर अपक्ष निवडणूक लढणार, असा इशारा शिंदे गटाचे नेते तथा शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी भाजपला दिला आहे. भाजपने गणपत गायकवाड यांच्या पत्नीला तिकीट दिल्यानंतर महेश गायकवाड काय भूमिका घेतात, हे पहावे लागणार आहे.

Share

-