दोन वर्षांपासून फरार पंडित गँगचा म्होरक्या अखेर जेरबंद:दोन पिस्तुले आणि काडतुसांसह शिवाजीनगर पोलिसांनी केली अटक
पुणे शहरातील गाजलेले मुंडी मर्डर प्रकरणातील आरोपी तसेच पंडित गँगचा म्होरक्या सूर्यकांत ऊर्फ पंडित ऊर्फ पिंटु ऊर्फ भाऊ दशरथ कांबळे (२९, रा. ताडीवाला रोड, खड्डा झोपडपट्टी) याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन पिस्तूले, चार जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहे. खून आणि मोक्काच्या गुन्ह्यात मागील दोन वर्षापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. सुर्यकांत उर्फ पंडीत याने शाळेत असताना १३ व्या वर्षी साथीदाराचा खुन केला होता . त्याच्या मुंडक्यासोबत तो रात्रभर साथीदारांसह फुटबॉल खेळला होता. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी मंगला चित्रपटगृहाबाहेर नितीन म्हस्के याचा खुन केल्यानंतर तो फरार झाला होता. अशी माहिती पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत दिली. गिल यांनी सांगितले, पंडित कांबळे याच्या टोळीची ताडीवाला रोड व दांडेकर पुल परिसरात दहशत आहे. पूर्व वैमनस्यातून या टोळीने १५ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री मंगला चित्रपटगृहाच्या मागे नितीन मोहन म्हस्के (३५, रा. ताडीवाला रोड) याचा तलवार, कोयता, रॉड, दगडाने मारुन निर्घुण खुन केला होता. या गुन्ह्यात शिवाजीनगर पोलिसांनी २० आरोपींना अटक केली होती. या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. मात्र, या गँगचा म्होरक्या पंडित हा फरार झाला होता. तो काही केल्या सापडत नव्हता. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील तपास पथक ११ मार्च रोजी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार सचिन जाधव यांना खबर मिळाली की, पंडित हा दांडेकर पुल परिसरात येणार आहे. खातरजमा केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या सुचनेनुसार सापळा रचण्यात आला.दांडेकर पुल येथील दीक्षित बागेसमोर त्याला ताब्यात घेण्यात आले. मागील १९ महिन्यांपासून तो गोवा, कर्नाटक तसेच महाराष्ट्राच्या सीमेवरील गावात राहत होता. तो मोबाईल वापरत नसल्याने त्याचा सुगावा लागत नव्हता. तसेच एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन वाटसरुंना आडवून त्यांच्याकडून मोबाईल हिसकावून घ्यायचा. या मोबाईलवरुन तो नातेवाईकांशी संपर्क करत असे. त्यामुळे पोलिसांची वेळोवेळी दिशाभूल होत होती. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी, उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस हवालदार रुपेश वाघमारे, दिपक चव्हाण, प्रमोद मोहिते, राजकिरण पवार, महावीर चलटे, अतुल साठे, अंमलदार सचिन जाधव, प्रविण दडस, सुदाम तायडे, श्रीकृष्ण सांगवे यांनी केली आहे़.