लाडक्या बहिणींचे पैसे परत काढून घेऊ नका:खासदार संजय राऊत यांचा सरकारवर निशाणा; बेळगाव प्रश्नावरुनही एकनाथ शिंदेंवर टीका

कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता लाडकी बहिण योजनेमध्ये महिलांच्या खात्यात 1500 रुपये टाकण्यात आले. यावर अनेकांचा आक्षेप होता. यातील निकष बदलावे लागतील असे मुख्यमंत्र्यांनी देखील आता सांगितले आहे. मात्र निकषाची शहानिशा न करताच महिलांना पंधराशे रुपये देण्यात आले, हे विधानसभा निवडणुकीमध्ये मते विकत घेण्यासाठी केले होते, असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. अनेक काम करणऱ्या महिला, ज्या मुंबईतील महिलांचे उत्पन्न खूप चांगले आहे. मोठ्या मोठ्या कार्यालयात चांगल्या पदावर त्या काम करतात, अशा घरातील तीन-तीन महिलांना सुद्धा लाडकी बहिण योजनेचे पैसे जात आहेत. ही गरीब आणि सामान्य महिलांसाठी योजना होती. ज्यांना उत्पन्नाचा आधार नाही. अशा ग्रामीण भागातील, शहरी भागातील महिलांसाठी योजना असावी, अशी आमची भूमिका होती. मात्र वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी देखील या योजनेत लाभ घेतला, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. लाडकी बहिणीचा पैसा चुकीच्या मार्गाने दिले गेले आहेत. आणि आता सरकारच्या तिजारीवर बोजा पडल्यामुळे त्यांचे डोळे उघडले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. आता ज्या महिलांना पैसे दिले आहेत, त्यांचे पैसे परत काढून घेऊ नका. त्यांना नोटीस पाठवू नका, अशी आमची मागणी असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. मात्र हे सर्व जे सुरू आहे, त्या सर्व घडामोडींवर आमचे बारीक लक्ष असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. बेळगाव प्रश्नी काँग्रेसचे राज्य, ही पळवट नाही बेळगाव प्रश्नाच्या प्रकरणी कर्नाटकात काँग्रेसची सत्ता असो किंवा भाजपची सत्ता असो. सत्ता कोणाची असो त्याने काहीही फरक पडत नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. भाजपचे राज्य असताना देखील असे प्रकार घडले होते. एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटील हे राज्यात मंत्री असताना त्यांच्याकडे सीमा भागाचा कारभार होता. मात्र, एकनाथ शिंदे यांनी कधीही बेळगाव जाऊन सीमा वासियांचे ऐकले नाही, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. मी वारंवार बेळगाव मध्ये गेलो, मला अटक करण्यात आली, माझ्यावर खटले दाखल करण्यात आले असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. मात्र आपल्याला अटक होईल आणि पोलिसांचे दंडूके खावे लागतील, म्हणून त्यावेळेसचे मंत्री कधीही बेळगावत गेले नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे राज्य आहे, ही पळवट नाही. राज्य कोणाचे असले तरी देखील प्रश्न तोच असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. अखिलेश यादव यांच्याची चर्चा अबू आझमी यांनी घेतलेल्या भूमिकेसंदर्भात आम्ही सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याशी चर्चा करून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. गेली अनेक वर्ष समाजवादी पक्ष आमच्या सोबत आहे. त्यांनी आम्हाला सरकार स्थापनेसाठी मदत केली आहे. विधानसभा आणि राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याची वेळ आली त्यावेळी मात्र, त्यांची मते आम्हाला मिळाली नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. ती मते कोणत्या टीमला मिळाली? हे आम्हाला माहिती नाही. असेही राऊत यांनी म्हटले आहे. मात्र, मानखुर्दला शिवसेनेने उमेदवार दिला नाही. अबू आझमी यांच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार दिला असता ते विजयी होऊ शकले नसते, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.

Share