ब्रिटिश गायक ॲलन वॉकर लाईव्ह कॉन्सर्ट:मोबाईल चोरट्यांकडून 36 मोबाईल चोरीस

पुण्यातील खराडी येथे एका मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ब्रिटिश गायक ॲलन वॉकर यांच्या संगीत रजनी कार्यक्रमात (लाइव्ह कॉन्सर्ट) चोरट्यांनी हातसफाई केल्याचा प्रकार घडला. या रजनीत चोरट्यांनी प्रेक्षकांकडील ३६ मोबाईल चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. चंदननगर पोलिसांनी याप्रकरणी मुंबई, हैदराबादमधील चोरट्यांच्या टोळीला अटक केली. सय्यद महंमद इद्रीस शेख (वय २१, रा. मुंबई), अखिल व्यंकटरमना गोदावरी (वय २४ रा. हैदराबाद), लोकेश हनुमंत पुजारी (वय ३१, रा. मुंबई), पप्पू भागीरथी वैश्य (वय २४ रा. मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडीतील न्यू इंग्लिश फिनेक्स स्कूलच्या मैदानावर ब्रिटिश गायक ॲलन वॉकर लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. संगीत रजनीसाठी होणारी गर्दी विचारात घेऊन पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता.शेख, गोदावरी, पुजारी, वैश्य यांनी गर्दीत प्रेक्षकांकडील मोबाइल चोरले. गर्दीत मोबाइल चोरीच्या तक्रारी पोलिसांकडे आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. संशय आल्याने पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली. त्यांच्याकडून १४ मोबाइल जप्त करण्यात आले. याप्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या दोन ते तीन साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिली. पिस्तूल बाळगणारा सराईत आरोपी जेरबंद पिस्तूल बाळगणाऱ्या एका सराईताला सिंहगड रस्ता पोलिसांनी हिंगणे परिसरातून अटक केली. त्याच्याबरोबर असलेल्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून दोन पिस्तूल आणि चार जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहेत. राज रवींद्र जागडे (वय २२, रा. वडगाव बुद्रूक, सिंहगड रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. जागडे सराइत गुन्हेगार आहे. हिंगणे परिसरातील कॅनोल रस्त्यावर तिघे जण थांबले असून, त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. सहायक निरीक्षक सचिन निकम, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, स्वप्नील मगर, विनायक मोहीते, शिवाजी क्षीरसागर यांच्यासह पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली. तेव्हा त्यांच्याकडे दोन पिस्तूल आणि चार काडतूसे जप्त करण्यात आली. आरोपींनी पिस्तूल कोठून आणले, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

Share

-