बिल्डरच्या अपहृत मुलाच्या सुटकेचा थरार:2 कोटींची मागितली होती खंडणी; अपघात झाला अन् मिळाली तपासाची लिंक, 3 जणांना अटक
छत्रपती संभाजीनगर येथे मंगळवारी रात्री शहरातील नामांकित बिल्डरच्या मुलाचे 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केले होते. या प्रकरणातील तिघांना पोलिसांनी अटक केली असून मुलाची देखील सुखरूप सुटका करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास 7 वर्षीय चैतन्य सुनील तुपे हा वडिलांसोबत घराबाहेर फिरत होता. यावेळी काळ्या रंगाची चारचाकी तिथे आली आणि वडिलांच्या समोरच मुलाचे अपहरण केले. ही घटना मंगळवारी रात्री घडली होती. अपहरणाचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झाला आहे. यावेळी अपहरणकर्त्यांनी मुलाची सायकल देखील रस्त्याच्या कडेला टाकून दिल्याचे दिसत आहे. कसे झाले अपहरण? मंगळवारी रात्रीचे जेवण झाल्यानंतर सुनील तुपे आपला मुलगा चैतन्यसह (7 वर्षे) फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. सुनील पुढे चालत असताना मुलगा सायकलवर मागे होता. सिडको एन-4 च्या भागात ते होते. रात्रीचे 8.40 झाले अन् एक काळ्या रंगाची चारचाकी आली. सेंट्रल मॉल येथून आलेल्या या चारचाकीतून तिघे जण उतरले अन् त्यांनी सुनील यांच्यासमोर त्यांच्या मुलाचे अपहरण केले. ही चारचाकी आधी जयभवानीनगरकडे गेली नंतर सिडकोमार्गे शहराबाहेर पळून गेले. असा लागला चैतन्य तुपेचा शोध अपहरणकर्ते छत्रपती संभाजीनगर येथून सिल्लोड, भोकरदन या मार्गाने माहोराकडे गेले. माहोराकडे जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. यावेळी कारमधील असलेला एक आरोपी प्रमोद शेवैत्रै गंभीर जखमी झाला. त्याला भोकरदन येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते आणि इथेच पोलिसांना चैतन्य तुपेच्या केसची लिंक लागली. यावेळी जालना पोलिसांनी या संशयित आरोपी प्रमोदची चौकशी करण्यास सुरुवात केली असता त्याच्याकडून उर्वरित तीन आरोपींच्या लोकेशनची माहिती मिळाली. लोकेशनवर पोलिसांचा तत्परतेने छापा लोकेशनच्या माहितीच्या आधारे जालना पोलिसांसोबत छत्रपती संभाजीनगर पोलिसांचे देखील पथक जाफराबाद तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे रवाना झाले. यावेळी दिलेल्या लोकेशनवर पोलिसांनी तत्परतेने छापा टाकत अपहरण झालेल्या 7 वर्षीय चैतन्य तुपेची सुखरूप सुटका केली. यावेळी बंटी गायकवाड याच्यासह हर्षल असे अन्य दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली. चौकशीत हे तिन्ही आरोपी ब्रह्मपुरी येथील रहिवाशी असल्याचे समजते. चैतन्यचा टाटा अन्… पोलिसांनी चैतन्यची सुखरूप सुटका केली. त्यानंतर त्याचे मोबाइलवर घरातल्या मंडळींशी बोलणे करून दिले. आई-बाबांचे चेहरे दृष्टीस पडतास चैतन्यच्या चेहऱ्यावर खऱ्या अर्थाने चैतन्य आले. त्याने हासून घरातल्या सर्वांशी गप्पा मारल्या. आता आपण पोलिसांसोबत घरी येतोय असा निरोप दिला. घरातल्या मंडळींना टाटा करत फोन ठेवला. हा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. पोलिस अक्षीक्षक म्हणाले… या कारवाईवर पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले, छत्रपती संभाजीनगर येथून अपहरण झालेल्या चैतन्य तुपे या 7 वर्षीय मुलगा सापडला असून या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई जालना पोलिसांसह छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी पार पाडली आहे. आराेपींच्या शाेधासाठी 100 फुटेज तपासले