केम छो भाई तमे, सारू छो ना?:आव्हाडांचा गुजरातीतून संवाद साधत सरकारला टोला; म्हणाले – मुंबईत राहायचे असल्यास गुजराती बोलायचे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी यांनी मुंबईची भाषा ही मराठी नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांकडून अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले जात आहे. भैय्याजी जोशींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुजराती भाषेमधून संवाद साधला. आव्हाड यांनी विधानभवन परिसरात भाजप नेते प्रविण दरेकरांशी गुजरातीमध्ये बोलता त्यांना टोला लगावला आहे. दरेकर भाई केम छो तमे, सारू छो ना? असा सवाल विचारत आव्हाड यांनी दरेकरांना डिवचले. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना देखील गुजराती भाषेतून सुरुवात केली. मुंबईत विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात. मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलं पाहिजे असे नाही. विशेष म्हणजे त्यांनी हे वक्तव्य महाराष्ट्राचे मंत्री व भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या समोरच केले होते. त्यांच्या या विधानावर आता नवीन वाद निर्माण झाला आहे. विरोधकांकडून भैय्याजी जोशी यांच्यासह सरकारवर टीका केली जात आहे. आता मुंबईत राहायचे असेल, तर गुजराती बोलायचे जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना केम छो भाई, सारो छे ना असे म्हणत सुरुवात केली. यावरून पत्रकारांनी त्यांना विचारले असता, आता मराठी नाही बोलायचे, असे आव्हाड म्हणाले. आता मराठी नाही, तर केम छो, ढोकला, फाफडा, जलेबी आता आपल्याला मराठी बटाटा वडा, वडापाव नाही बोलायचे. आता मुंबईत राहायचे असेल, तर गुजराती बोलायचे. आपल्या पोरांना गुजराती शाळेत घाला. कारण गुजराती ही आता घाटकोपरची भाषा झाली. ती कालांतराने मुलुंटची भाषा होईल. त्यानंतर दहिसर आणि अंधेरीची भाषा होईल. मराठी फक्त दादरची भाषा मराठी राहील. म्हणजे आपण फक्त दादरपुरते मर्यादीत राहणार. मराठी माणसांना जागे केल्याबद्दल थँक्यू भैय्याजी जोशी, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. जोशींच्या वक्तव्यावरून राऊतांचा सरकारवर हल्लाबोल मराठी ही आमची राजभाषा आहे. मराठी ही राजभाषा असल्यामुळे भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य राजद्रोह असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य महायुती सरकारने कसे सहन केले? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे. भैय्याजी जोशी हे भाजपचे धोरण ठरवणारे व्यक्ती असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. दोन मिंद्या आणि लाचार उपमुख्यमंत्र्यांनी देखील या वक्तव्याचा निषेध करायला हवा, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत येऊन असे वक्तव्य करण्याचे धाडस त्यांनी कसे केले? मुंबई ही मराठी माणसाची नाही हा अपमान नाही का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. भाजपची हीच निती आहे का? भैय्याजी जोशी यांचा वक्तव्याचा ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही समाचार घेत भाजपवर निशाणा साधला. भाजपच्या पोटात होते ते ओठात आले. भाजपला मुंबई तोडायची आहे. मराठीला दूर करायचे आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. आरएसएस असे बोलत असतील, तर मग भाजपची हीच निती आहे का? असा सवालही त्यांनी केला. भैय्याजी जोशींवर कारवाई झाली पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबईत अनेक लोक येतात, मात्र मुंबईची भाषा बदलण्याचा प्रयत्न करू नये. भैय्याजी जोशी यांनी त्यांच्या विधानासाठी माफी मागावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ते मीडियाशी बोलत होते.