उमेदवारांचा प्रत्यक्ष भेटीवर जोर; पण मतदार राजा शेतात:सिल्लोडमधील चित्र, शेतकरी कामात व्यस्त

सिल्लोड यंदा परतीचा पाऊस झाल्याने शेतातील मका, सोयाबीन काढणी, कापूस वेचणीसह रब्बी हंगामातील गहू, हरभऱ्याची पेरणी या शेतीकामांमध्ये तालुक्यातील शेतकरी मतदार गुंतलेला आहे. यामुळे गावात प्रचारासाठी येणाऱ्या उमेदवाराचा थेट संवाद मतदारांसोबत होताना दिसून येत नसल्याने ग्रामीण भागात अजूनही इलेक्शन फीव्हर चढला नसून उमेदवार गावात व मतदार शेतात अशी परिस्थिती परिसरात दिसून येत आहे. सिल्लोड विधानसभा मतदारसंघात सोयगाव तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे. तालुक्यातील मतदार ग्रामीण भागात वसलेला आहे. परतीचा पाऊस झाल्यामुळे शेतात ओलावा टिकून असल्याने शेतातील प्रलंबित कामे सोयाबीनचे खळे व कापसाची वेचणी, गहू-हरभऱ्याची पेरणी या शेतीकामांमध्ये शेतकरी व शेतमजूर व्यग्र आहेत. शेतात कापूस वेचणीस आलेला असून शेतकरी मजूर शेतीकामासाठी भल्या पहाटे शेतावर निघून जातात, तर त्यांना गावात परतायला संध्याकाळ होते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा प्रचार मागील दोन दिवसांपासून जोर धरत असून प्रमुख पक्षांचे उमेदवार व काही अपक्ष उमदेवार ग्रामीण भागात पोहोचून प्रचार करताना दिसून येत आहेत. ते सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रचाराला ग्रामीण भागात येतात. यापैकी दुपारच्या वेळी मतदार व उमेदवारांची भेट होत नाही. यामुळे अनेकांकडून आता सायंकाळी उशिरापर्यंत अशा मतदारांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन भेटी घेण्यावर जोर दिला जात आहे. बळीराजा नाराज बाजारपेठेत कापूस, सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. सोयाबीनचेही उत्पन्न घटल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून शेतात लावलेला खर्चही निघणे कठीण असल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत अडकले आहेत. अशीच स्थिती कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आहे.

Share