चांदूर बाजार तालुक्यात गावोगावी निनादताहेत काकड आरतीचे स्वर:थंडीतही नियमित आरती; चैतन्य अन् मंगलमय वातावरणाची निर्मिती

कार्तिक महिन्याचे मोठे धार्मिक महत्त्व आहे. आजही चांदूर बाजार तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात भाविक दररोज भल्या पहाटे काकडा आरती करत संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालतात. आबालवृद्ध भाविक दररोज मोठ्या प्रमाणात काकड आरतीत सहभागी होत सूर्यदर्शनाने प्रभात फेरीची सांगता करतात. तालुक्यात गावोगावी काकड आरतीचे स्वर निनादत आहेत. त्यामुळे परिसरातील वातावरण चैतन्यमय व भक्तिमय झाल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी विजयादशमी ते वैकुंठ चतुर्दशीपर्यंत काकड आरती व त्यानिमित्त काढलेली प्रभात फेरी चालते. डोक्यावर टोपी, हातात टाळ व मुखी हरिनामाचा गजर करत आबालवृद्ध भाविक थंडीची तमा न बाळगता यामध्ये सहभागी होत आहेत. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या काकड आरतीला तालुक्यात कोजागरी पौर्णिमेपासून सुरुवात झाली आहे. कोजागरी पौर्णिमेपासून तर त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत गावोगावी चालणारा काकड आरती हा मोठा धार्मिक उत्सव आहे. भल्या पहाटे ईश्वराचे नामस्मरण, आराधना करून दिव्यज्योतीने ओवाळणे म्हणजे काकड आरती होय. काकड आरती ही धार्मिक परंपरा अनेक वर्षांपासून ग्रामीण भागात अव्याहतपणे सुरू आहे. काही गावात मंदिरात, तर काही गावातून टाळ मृदंगांच्या गजरात काकड आरती गाव प्रदक्षिणा करते. गृहिणी सकाळी उठून सडा, रांगोळी टाकतात. गाव प्रदक्षिणा घालणाऱ्या काकड आरतीचे घरोघरी स्वागत व पूजन करण्यात येत आहे. भल्या पहाटे टाळ, मृदंगांच्या गजरात होते काकड आरती ठिकठिकाणी टाळ, मृदंगांच्या गजरात काकड आरती केली जाते. यासोबतच ग्राम प्रदक्षिणा घातली जाते. भल्या पहाटे कानावर आरतीचे स्वर पडत असल्याने नागरिकांनाही प्रसन्न वातावरणाची अनुभूती मिळत आहे.

Share