निवडणुकीच्या निकालानंतर सत्तेची समीकरणे बदलणार?:नवाब मलिकांनंतर दिलीप वळसे पाटील यांचे विधान, राज्यात चर्चांना उधाण

प्रत्येक पक्षाचे किती आमदार निवडून येतात त्यावर पुढील गणित अवलंबून आहे. कदाचित निवडणुकीच्या निकालानंतर काही समीकरणे बदलू शकतात, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे. याआधी नवाब मलिक यांनी देखील निवडणुकीच्या निकालानंतर समीकरणे बदलू शकतात, असे म्हटले होते. आता दिलीप वळसे पाटलांनी असे वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दिलीप वळसे पाटील का मुलाखतीत म्हणाले की, पुढे काही होईल याबाबत आताच सांगता येणार नाही. एकीकडे महाविकास आघाडी तर दुसरीकडे महायुती आहे. दोन्हीकडे 3-3 पक्ष आहेत. उद्या कोणाचे सरकार येईल, ते थोडावेळी बाजूला ठेवू. प्रत्येक पक्षाचे किती आमदार येतील, ते बघावे लागणार आहे. त्यानंतर खरे जुळवले जाईल. त्यात निवडणुकीच्या निकालानंतर काही समीकरणे बदलू देखील शकतात. निकालानंतर बहुमत होत नसेल, तर सरकार स्थापनेसाठी काही ना काही करावे लागेल. 6 पक्ष असल्यामुळे गणित जुळवण्यासाठी भरपूर वाव असल्याचेही त्यांची यावेळी अधोरेखित केले. आता दिलीप वळसे पाटील आणि तीन दिवसांपूर्वी नवाब मलिक यांनी निवडणुकीनंतरच्या राजकीय समीकरणांबाबत केलेल्या विधानांवरून 2024 च्या निकालानंतरही 2019 सारखी अनेक समीकरणे होतील का?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. काय म्हणाले होते नवाब मलिक ? 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला बदल 23 नोव्हेंबरनंतर पुन्हा होऊ शकतो, असा दावा नवाब मलिक यांनी 3 दिवसांपूर्वी केला होता. विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार किंगमेकर होतील, असा अंदाज नवाब मलिक यांनी व्यक्त केला. शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख एकनाथ शिंदे हातमिळवणी करतील, अशी अटकळ वर्तवली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. नवाब मलिक यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. निवडणुकीनंतर भाजपाचेच सरकार येईल किंवा अजित पवार भाजपाबरोबरच असतील, हे आताच सांगता येणार नाही. एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांचे काही तरी चालले आहे, असे काही लोक सांगत आहेत. अशी वेगवेगळी चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. पाच वर्षांपूर्वी कोण कुठे होता? लोकांना कसे कसे पकडून आणले? हे सर्व माझ्या डोळ्यासमोर घडलेले आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगितले होते.

Share

-