छोटा पुढारीला आले धमकीचे कॉल:रस्त्याच्या व्हिडिओवरून मंत्री तानाजी सावंतांचा फोन आल्याचा आरोप

धाराशिव येथील सर्वसामान्य जनतेला होणारा रस्त्याचा त्रास व्यक्त केल्यानंतर छोटा पुढारी अर्थात घनश्याम दरोडे याला मंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी कॉल करत धमक्या दिल्या असल्याची माहिती घनश्याम दरोडे याने समाज माध्यमावर व्हिडिओ पोस्ट करत दिली आहे. तू हा मुद्दा उचललाच कसं काय? असे म्हणत मला धमकी दिल्याचा आरोप घनश्याम दरोडे याने केला आहे. छोटा पुढारी याने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हणाला, मित्रांनो मला सांगा कधीपर्यंत मी नेत्यांच्या बाजूने बोलू? जे माझ्या जनतेचा सत्याचा आवाज आहे ते मांडू की नको? आज मला तानाजी सावंत साहेबांचा फोन येतोय, मला धमक्या दिल्या जात आहेत. जर मला धमक्यांचे फोन आले तर मी रीतसर कायदेशीर कारवाई करेल. मी तुमच्यासाठी नाही तर जनतेसाठी जगणार आहे. तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्यांचा मला धमक्यांचा कॉल आला तर मी लीगल कारवाई करेल, हे ध्यानात ठेवा, असा इशारा देखील छोटा पुढारी अर्थात घनश्याम दरोडे याने दिला आहे. पुढे आणखी एका व्हिडिओमध्ये घनश्याम दरोडे अर्थात छोटा पुढारी म्हणाला, आपण एक रस्त्याचा व्हिडिओ केला, तो व्हिडिओ बघून मला बऱ्याच लोकांनी ट्रोल केले, अनेकांनी मला विचारले सुपारी घेऊन व्हिडिओ बनवतो का? मला यांचा काहीच फरक पडत नाही. पण मित्रांनो महाराष्ट्राची एक सत्य परिस्थिती समोर आली, जनता खड्ड्यात गेली तरी चालेल, पण नेता जगला पाहिजे, नेत्याचा पद राखले पाहिजे. छोटा पुढारी पुढे म्हणाला, हा व्हिडिओ अनेकांना आवडला, पण अनेकांना तो जिव्हारी लागला. आज रस्त्याचा व्हिडिओ केला, पाण्याचा करेल, माझ्या महाराष्ट्र दौरा सुरू आहे. प्रत्येक मतदारसंघात जाऊन तिथल्या रस्त्यांचा, पाण्याचा, आरोग्याचा प्रश्न असेल तो मी समोर आणणार. कारण बऱ्याच लोकांना मिरच्या लागल्या, की घनश्याम आमच्या मतदारसंघात का आला, मी कोणालाही विचारून येणार नाही, मी डायरेक्ट येणार रोखठोक बोलणार कारण माझ्यासोबत जनतेचा आवाज आहे. आपण जरा नेता कमी धरा, आपल्या आई वडिलांची, आपल्या समाजाची, आपल्या जनतेची काळजी करा जरा. आता इलेक्शन आले आहे त्याचा विचार करा, असा सल्ला देखील घनश्याम दरोडे याने दिला आहे.

Share

-