मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली कठोर भूमिका:एकाच वाक्यात दिला होता इशारा अन् धनंजय मुंडेंनी दिला राजीनामा
राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी देखील तो स्वीकारला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात गेल्या दोन महिन्यांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. मात्र, या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे सांगत धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्यास तयार नव्हते. तसेच अजित पवार यांनी देखील राजीनामा घेण्यास विलंब दर्शवला होता. संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयानक फोटो व व्हिडिओ समोर आल्यानंतर राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याचा आग्रह करत इशारा दिला असल्याचे देखील बोलले जात आहे. देवेंद्र फडणवीस हे पूर्वीपासूनच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, यासाठी आग्रही होते. त्यांनी अजित पवार यांच्याशी तीन ते चार वेळा यावर चर्चा देखील केली होती. तसेच धनंजय मुंडे यांना देखील राजीनामा देण्यास समजूत काढली होती. मात्र, अखेर देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतल्याचे समजते. देवेंद्र फडणवीस यांनी थेट धनंजय मुंडे यांना इशारा दिला होता. जर तुम्ही राजीनामा देणार नसाल, तर मला राज्यपालांना पत्र लिहून तुम्हाला मंत्रिमंडळातून काढण्याची कारवाई करावी लागेल. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर संपूर्ण वातावरण बदलले असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर मग राजीनामा देण्याच्या हालचालींना वेग आला व अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला व राज्यपालांनी देखील मुंडे यांचा राजीनामा लगेच स्वीकारला. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना उद्याच्या उद्या राजीनामा द्या, असे मुख्यमंत्र्यांनी काल पुन्हा सांगितले आणि आज सकाळी मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या हाती आला. तसेच या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच मुख्यमंत्र्यांनी अतिशय कडक आणि ठोस भूमिका घेतली होती, अशी सूत्रांची माहिती आहे. आमदारकी रद्द होईपर्यंत आपला लढा सुरू राहील – अंजली दमानिया दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता. त्यानुसार धनंजय मुंडे यांनी आज त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे. मात्र आता आमदारकीचा देखील राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. त्यांची आमदारकी रद्द होईपर्यंत आपला लढा सुरू राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सोबतच धनंजय मुंडे हे वैद्यकीय कारणाने राजीनामा दिल्याचे म्हणतात. मात्र, त्यांना मन तरी आहे का, असा सवालही त्यांनी केला आहे.