मुख्यमंत्री फडणवीस 5 फेब्रुवारीला बीड दौऱ्यावर:आमदार सुरेश धस यांची माहिती; परळी नगरपालिकेच्या ऑडिटची केली मागणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 5 तारखेला बीडच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांची आज त्यांनी भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी काही मागण्या देखील केल्या आहेत. या भेटीनंतर सुरेश धस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुरेश धस म्हणाले, माझ्या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री महोदय येत्या 5 तारखेला येणार आहेत. मच्छिंद्रनाथ देवस्थान आणि जवळपास सुधारित प्रशासकीय मान्यतेसह 2 हजार 800 कोटींचा एक प्रकल्प माझ्या मतदारसंघात होणार असून त्याच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री येणार आहेत, त्याचे कॉन्फिर्मेशन आज घेतले आहे. सुरेश धस म्हणाले, परळी तालुक्यातील बर्दापूर, परळी ग्रामीण आणि शिरसाळा पोलिस स्टेशनमध्ये 10 ते 17 वर्षांपासून सतत एकाच ठिकाणी राहणाऱ्या पोलिसांच्या बीड जिल्ह्याच्या बाहेर बदल्या कराव्यात. वाल्मीक कराड यांना फरार होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले आहे ते सगळे लोक त्यांचे नंबर त्याच्या पुराव्यासह कागदपत्र आम्ही पोलिसांकडे दिले आहेत, ते सगळे सहआरोपी या प्रकरणात झाले पाहिजेत. परळी नगरपालिका स्पेशल ऑडिट त्याठिकाणी व्हावे, अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे. एका एका व्यक्तीच्या नावावर 46 कोटी रुपयांची बिल विष्णू चाटे सारखा जो आरोपी आहे त्याच्या नावावर उचलले गेले आहेत. एकाच रस्त्यावर पाच पाच वेळा पैसे उचलले गेले आहेत, असा दावा देखील सुरेश धस यांनी केला आहे. पोलिस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप पुढे बोलताना सुरेश धस यांनी भास्कर केंद्रे या पोलिस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. 15 वर्षांपासून भास्कर केंद्रे हे तिथेच आहेत. त्यांचे स्वतःचे 15 जेसीबी आहेत, 100 राखेचे टिप्पर आहेत. तिथल्या मटक्यावाल्यासोबत त्यांची अर्धी पार्टनरशिप आहे, असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. मीडियाने एकदा असा खालून कॅमेरा लाऊन परळी शहरात जाऊन फिरून यावे, परळी शहरात कोणता रस्ता चांगला आहे याचे सर्टिफिकेट मीडियानेच द्यावे, अशी विनंती देखील सुरेश धस यांनी केली आहे. करुणा मुंडेंच्या गाडीत पिस्तूल ठवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी सुरेश धस म्हणाले, करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये ज्या पोलिस कर्मचाऱ्याने पिस्तूल ठेवला आणि तो साडीतला व्यक्ती कोण, त्याच्यात पोलिस अधिकाऱ्याने करुणा मुंडेच्या गाडीत पिस्तूल ठेवले तो अधिकारी अजूनही पोलिस खात्यात आहे, यांच्यावर कारवाई व्हावी. परळी थर्मलला काही अधिकारी गेल्या 20 वर्षांपासून एकाच पोस्टवर आहेत. परळी थर्मलमध्ये राहणाऱ्या या अधिकाऱ्यांना कोणत्या कोणत्या मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली, हे अशा प्रकारचे पत्र मी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. अवैध वाहतूक आजही सुरू परळीमध्ये अवैध राखेचे जे साठे आहेत ते साठे जप्त करण्यात यावेत. ते कोणाकोणाचे आहेत त्याची यादी माझ्याकडे आहेत. ते मी पोलिसांकडे दिले आहेत. तसेच अवैध वाहतूक आजही सुरू आहे. दिवसा बंद असते मात्र रात्री सुरू असते. बाहेरच्या राज्यातली आणि जिल्ह्यातली बंद असली तरी जिल्हांतर्गत सुरू आहे. भगीरथ बियाणी या नावाचे व्यापारी आणि भाजपचे कार्यकर्ते यांची अचानकपणे स्वतः गोळी झाडून आत्महत्या केली. या आत्महत्याची देखील चौकशी करण्याची मी मागणी केली आहे, अशी माहिती सुरेश धस यांनी दिली आहे.