वाहन तपासणीसाठी नागरीकांनी सहकार्य करावे:निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर हॉटेल्स, ढाब्यावर बेकायदेशीर कामे खपवून घेणार नाही- पोलिस अधिक्षक

हिंगोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मतदानापूर्वी 72 तास महत्वाचे असून या कालावधीत हॉटेल्स, ढाबा, लॉजेसची तपासणी केली जाणार असून या ठिकाणी बेकायदेशीर कामे खपवून घेतली जाणार नाही असा इशारा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी शनिवारी ता. 16 पत्रकार परिषदेत दिला आहे. येथील पोलिस अधिक्षक कार्यालयात पोलिस अधिक्षक कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांची उपस्थिती होती. यावेळी पोलिस अधिक्षक कोकाटे यांनी निवडणुक प्रक्रियेच्या कालावधीत जिल्हयात 1.61 कोटी रुपये जप्त केले असून या शिवाय 8 तलवार, दोन खंजर, 1 पिस्टल जप्त केले आहेत. गुटखा विक्रीच्या चार ठिकाणी टाकलेल्या छाप्यात 7 लाखांचा गुटखा जप्त केला असून 13.60 लाख रुपये किंमतीची 11 हजार 371 लिटर देशी दारु जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हयात निवडणुकी पूर्वीचे 72 तास व 48 तास महत्वपूर्ण असून या कालावधीत मतदारांना प्रलोभने दाखविण्याचे प्रकार नाकारता येत नाहीत. त्यासाठी वाढीव १५ पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकांना गावांचेही वाटप करून देण्यात आले असून त्या त्या गावात जाऊन ते पाहणी करणार आहेत. मतदारांना प्रलोभने दाखविण्याचे प्रकार आढळून आल्यास तातडीने कडक कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हयात हॉटेल, लॉज, ढाबे यांची तपासणी केली जाणार आहे. या ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गैरकृत्य होत असल्याचे दिसून आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. त्यामुळे लॉजचालकांनी त्यांच्याकडे येणाऱ्यांची खात्री करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. या शिवाय जिल्हयातील तपासणी नाक्यांवर वाहन तपासणी कडक केली जाणार असून एकही वाहन तपासणी शिवाय सोडले जाणार नाही. नागरीकांनी प्रवास करतांना त्यांच्या जवळ 50 हजारापेक्षा अधिक रक्कम असणार नाही याची दक्षता घ्यावी. वाढीव रक्कम वागळणे किंवा वाहतूक करावयाची असेल तर त्याची रितसर परवानगी घेण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या. वाहन तपासणीसाठी नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक कोकाटे यांनी केले आहे.

Share