मविआतील वाद विकोपाला?:खरगेंसोबतच्या बैठकीत राज्यातील नेते आक्रमक झाल्याचा दावा; पण काँग्रेस म्हणते – दाव्यात तथ्य नाही

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काँग्रेसच्या काही हक्काच्या जागांवर दावा केल्यामुळे महाविकास आघाडीतील जागावाटपाचा वाद विकोपाला गेल्याचा दावा केला जात आहे. काँग्रेसच्या नेत्यांसह ठाकरे गटानेही हा दावा फेटाळला आहे, पण सूत्रांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबतच्या बैठकीत राज्यातील काँग्रेस नेते या मुद्यावरून चांगलेच आक्रमक झाल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या मुद्यावरून काँग्रेस व ठाकरे गटात मतभेद झाल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाने विदर्भातील काही जागांवर दावा सांगितल्यामुळे हा वाद सुरू झाला. या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी राज्यातील नेत्यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत काँग्रेस नेत्यांनी ठाकरे गटाच्या आडमुठ्या भूमिकेवर चांगलाच संताप व्यक्त केल्याचा दावा केला जात आहे. ठाकरे गट काँग्रेसच्याच जागा का मागतो? सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गट काँग्रेसच्याच जागा का मागत आहे? ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जागा का मागत नाहीत? ठाकरे गट जागावाटपाच्या मुद्यावरून काँग्रेसला वेठीस धरत आहे. त्यामुळे काँग्रेसनेच आघाडीचा धर्म का पाळायचा? अशा विविध सवालांची सरबत्ती यावेळी काँग्रेस नेत्यांनी पक्षश्रेष्ठींवर केली. तसेच या मुद्यावर योग्य ते मार्गदर्शन करण्याची विनंतीही केली. महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसने ज्या ठिकाणी पक्षाचे संघटन नाही, त्या ठिकाणच्या जागांचा हट्ट धरला नाही, अशी बाबही त्यांनी यावेळी पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आणून दिली. तसेच या प्रकरणी ठाकरे गटाकडे ताठर भूमिका सोडण्याचीही अपेक्षा व्यक्त केली. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत काँग्रेस नेत्यांनी ठाकरे गटावर जागावाटपाच्या चर्चेत सहकार्य केले जात नसल्याचाही आरोप केला. काहीही झाले तरी विदर्भातील 12 जागा काँग्रेसने ठाकरे गटाला सोडू नये. कारण लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसचे राज्यातील कार्यकर्ते सक्रीय झाले आहेत. यापैकी बहुतांश जागांवर काँग्रेससाठी पोषक स्थिती आहे. त्यामुळे जागावाटपाच्या मुद्यावर मवाळ भूमिका घेण्याची काहीच गरज नाही, अशी आग्रही भूमिका त्यांनी यासंबंधी घेतली. महाविकास आघाडीत कोणताही वाद नाही दुसरीकडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जागावाटपाच्या मुद्यावर महाविकास आघाडीमध्ये कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट केले आहे. विदर्भातील जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेसमध्ये कोणताही वाद नाही. माध्यमांनी उगीच आमच्यात भांडण लावू नये. मंगळवार सायंकाळपर्यंत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे जागावाटप जाहीर होईल. आम्ही मेरीटच्या आधारावर उमेदवार देऊ. काँग्रेसची पहिली उमेदवार यादीही उद्या जाहीर होईल. आम्ही कालपासून दिल्लीत आहोत, असे ते म्हणालेत. उद्या सायंकाळपर्यंत स्थिती स्पष्ट होईल विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही महाविकास आघाडीत कोणताही वाद नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. आम्ही जागावाटपाचा तिढा थोडा सैल केला आहे. आमच्यात 16-17 जागांवर मतभेद होते. त्यात विदर्भातील 6-7 जागांचा समावेश होता. पण त्यावर तोडगा निघाला आहे. उद्या सायंकाळपर्यंत स्थिती स्पष्ट होईल. जागावाटप व उमेदवार यादीही जाहीर होईल. पण महाविकास आघाडीत या मुद्यावर कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही आघाडी म्हणून लढणार आहोत. आघाडीत 3 पक्ष असल्यामुळे थोडे इकडे तिकडे होते, असे ते म्हणाले.

Share

-