भाजपकडून रडीचा डाव सुरू:163 मतदारसंघात पिपाणीवर उभे केले उमेदवार, सुप्रिया सुळे यांची टीका
भाजपने 163 जागांवर पिपाणी चिन्हावर अपक्ष उमेदवार देत रडीचा डाव खेळला आहे. निवडणूक आयोगाने चिन्ह्याच्या नावात बदल न केल्याने साताऱ्यामध्ये महायुतीचा उमेदवार विजयी झाला, हे स्वत: अजित पवारांनी कबुल केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस हा अजित पवार याचा पक्ष नाही, घड्याळ चिन्ह देखील त्यांचे नाही. जर पक्षाच्या चिन्ह्याखाली ‘न्यायप्रविष्ट’ असे लिहिले नसेल तर तुम्ही मला त्याचे फोटो पाठवा, मी त्यांना कोर्टाकडून नोटीस पाठवते, असे त्यांनी म्हटले आहे. ते अजितदादांनाच विचारा सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गौतम अदाणी राष्ट्रवादी आणि भाजपच्या बैठकीला उपस्थित होते का नाही, हे सांगता येणार नाही, कारण अजित पवार कधी हो म्हणतात तर कधी नाही. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही अजितदादांनाच विचारावे तेच काय ते उत्तर देऊ शकतील. टीकाकरुन महागाईच्या प्रश्न सुटणार नाही सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही. हे देवाभाऊंना माहिती आहे, त्यांचा हा अधिकार मी हिरावून घेणार नाही, इतना तो चलता है. पण शरद पवार यांच्यावर टीकाकरुन महागाईचा प्रश्न सुटणार नाही. भाजपकडे सांगण्यासारखे नाही, त्यामुळे ते शरद पवारांवर टीका करतात. देवाभाऊ नाव मला खूप आवडते सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही तर पक्षाच्या विरोधात आमची लढाई सुरू आहे. कोर्टात केस सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा अजित पवार याचा पक्ष नाही, चिन्ह देखील त्यांचे नाही, असे कोर्टाने स्पष्ट सांगितले आहे. तर देवाभाऊ हे नाव मला खूप आवडते. पण त्याला संगत खराब लागली. आजच्या भाजपपेक्षा आधीची भाजप चांगली होती.