काँग्रेस केवळ आश्वासने देते त्याची पूर्तता करत नाही:माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची टीका
महाविकास आघाडी पैकी फक्त काँग्रेसची तीन राज्यात सरकारे आहेत.त्या ठिकाणी काँग्रेसने जेवढी वचने दिली,आश्वासने दिली आणि गॅरंटी दिली त्यापैकी अनेक गॅरंटी मुळीच पूर्ण झाल्या नाहीत, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत केली. जावडेकर म्हणाले, काँग्रेसचे नेते इथे येऊन महाराष्ट्रात थापा मारून गेले,मी फक्त प्रत्येक राज्याचा संक्षिप्त आढावा घेतो. हिमाचल प्रदेशात काँग्रेसने आश्वासन दिलं होतं की दरवर्षी एक लाख नोकऱ्या देऊ.प्रत्यक्षात दीड लाख सरकारी पद त्यांनी रद्द केली आणि पुढील दोन वर्ष भरती न करण्याचा निर्णय घेतला. दुसरे आश्वासन ओल्ड पेन्शन देण्याचे होते. परंतु प्रत्यक्षात सध्याचा पगारच वेळेवर मिळत नाही अशी व्यथा आहे.त्याचप्रमाणे बेरोजगारांना दरमहा भत्ता देण्याची गॅरंटी दिली होती,परंतु प्रत्यक्षात कुणाही युवकांना असे पैसे देण्यात आले नाहीत. कर्नाटक मध्ये काँग्रेसने दोन लाख युवकांना दरमहा 3 हजार रुपये बेरोजगार भत्ता देण्याचं गॅरंटी दिली होती प्रत्यक्षात तोंडाला पाने पुसली. महिलांना मासिक दोन हजार रुपये देण्याचे मान्य करून प्रत्यक्षात गेल्या दोन महिन्यात हे पेन्शन देण्यात आले नाही. तेलंगणात बेरोजगार आणि महिला पेन्शन दिलेच नाही.त्यामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या गॅरंटी म्हणजे निश्चित फसवणूक करण्याचा जाहीरनामा आहे पुढे ते म्हणाले, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मध्यंतरी एक लेख लिहून देशातील उद्योग जगतामध्ये मक्तेदारी होऊन,ठराविक उद्योगांनाच वाव मिळतो,अशी मांडणी केली आहे.परंतु ही सर्वथा धूळफेक आहे.अशी व्यवस्था काँग्रेस सत्तेत असताना होती.तेव्हा लायसन्स, परमिट राज होते. आता व्यवस्था नीट झाल्यामुळे नवे उद्योग फार मोठ्या संख्येने स्थापन होत आहेत.केवळ स्टार्टअप चा विचार केला, तरीसुद्धा 2014 मध्ये देशामध्ये 400 स्टार्ट अप होते. आता 1 लाख 40 हजार स्टार्टअप आहेत .हे उद्योगांचं खऱ्या अर्थाने लोकशाहीकरण आहे,मक्तेदारीकरण नाही. कारण त्यामध्ये कोणीही युवक स्वतंत्रपणे आपला उद्योग सुरू करत आहे.आणि त्याला चांगले यशही येत आहे.मक्तेदारी आणि काही लोकांनाच उद्योगाला लायसन्स परमिट देण्याचं काम काँग्रेस करत होतं.मोदी सरकारच्या काळात,उद्योग धंद्यांचं लोकशाहीकरण झालं असून, सर्वांना उद्योग करायला आता खऱ्या अर्थाने प्रोत्साहन मिळत आहे.महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान बदलण्यात येईल,आरक्षण संपवण्यात येईल असा खोटा प्रचार केला होता.पण आता जनतेला त्यातला खोटेपणा लक्षात आला आहे.वस्तुस्थिती अशी आहे की या देशामध्ये घटना संपवण्याचे काम काँग्रेसनेच केलं.