दानवे, खैरेंवर आरोप; तनवाणी समर्थकांचे राजीनामे:शिवसेना ठाकरे गटाच्या दोन माजी नगरसेवकांसह 18 पदाधिकाऱ्यांचा समावेश
शहरातील उद्धवसेनेला गटबाजीने घेरले आहे. त्यामुळे सर्वसामान्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान होते आहे. बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. शहरात अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे हे दोन नेते असताना गटबाजी संपत नाही. एका समाजालाच पदे दिली जात असल्याचा आरोप करीत तनवाणी गटातील 18 पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (7 नोव्हेंबर) उद्धवसेना सोडली. उपजिल्हाप्रमुख सचिन जव्हेरी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
शिवसेना ठाकरे गटातर्फे मध्य विधानसभा मतदारसंघात तत्कालीन जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र हिंदू मतांमध्ये फूट पडणार असल्याची भूमिका घेत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर ठाकरे गटाने शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांना ऐनवेळी उमेदवारी देत किशनचंद तनवाणी यांच्याकडील जिल्हाप्रमुखपदाचा पदभार काढून घेतला. त्यामुळे नाराज झालेले तनवाणी यांनी बुधवारी 6 नोव्हेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. यामध्ये उपजिल्हाप्रमुख सचिन जव्हेरी, सुधीर नाईक, विभागप्रमुख सोमनाथ बोंबले आदी पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. कुठे जाणार निश्चित नाही किशनचंद तनवाणी यांनी बुधवारी राजीनामा दिला. त्या पाठोपाठ 18 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. मात्र त्यांनी पुढील भुमिका स्पष्ट केली नाही. कुठल्या पक्षात जातील किंवा निवडणुकीत कुठल्या उमेदवाराचा प्रचार करतील, हे मात्र स्पष्ट केले नाही. मात्र या राजीनामा नाट्यामागे करते करविते कोण, याबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे. गुलमंडीच्या राजकारणाचे पडसाद संपूर्ण शहरावर पडतात, असे कायम बोलल्या जाते. या 18 पदाधिकाऱ्यांमध्ये पूर्व, मध्य आणि पश्चिम मतदार संघातील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.