दत्तात्रय गाडेला नेमके कोणी पकडले?:ग्रामस्थ गणेश गव्हाणे यांचा दावा; म्हणाले- पोलिसांनी भावाला मारले, त्याचा राग होता
स्वारगेट परिसरातील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे आणि माझा भाऊ सोबत राहत होते. त्यामुळे पोलिसांनी माझ्या भावाला मारहाण करत दत्तात्रय गाडे याची विचारपूस केली. याच रागातून मी आरोपीचा शोध घेत होतो. अखेर आरोपी मला सापडला आणि पळत असताना मी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, असा दावा गावातील ग्रामस्थ गणेश गव्हाणे यांनी केला आहे. त्यामुळे आता आरोपी नेमका कसा पकडला गेला? याबाबत चर्चा सुरू आहे. आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध पोलिस आणि गावातील ग्रामस्थ देखील घेत होते. या दरम्यान आरोपीला आता ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र या संदर्भात या गावातील रहिवासी गणेश गव्हाणे यांनी आरोपीला आपण ताब्यात घेऊन पोलिसांना सोपवले असल्याचा दावा केला आहे. या संदर्भात त्यांनी एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. गावातील सर्व जण पोलिसांना मदत करत होते. पोलिस कर्मचारी गावातील प्रत्येकाची विचारपूस करत होते. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात भीतीदायक वातावरण होते. मात्र पोलिसांनी माझ्या भावाला मारले. माझा भाऊ आणि आरोपी सोबत राहत होते. त्यामुळे त्याला मारहाण करण्यात आली होती. त्याच रागातून मी आरोपीचा शोध घेत होतो. अखेर जीपीएल क्रिकेट मैदान परिसरामध्ये चंदन वस्ती आहे. तेथेच आरोपी फिरत असल्याची माहिती मला मिळाली. त्या ठिकाणी गेल्यावर मी स्वतः आरोपीला पाहिले, तो पळत असताना मी त्याला पकडून माझ्या संपर्कात असलेल्या पोलिसांच्या ताब्यात दिले, असा दावा गणेश गव्हाणे यांनी केला आहे. आरोपीला पकडून देणाऱ्यास 1 लाखाचे बक्षीस पुण्यातील स्वारगेट बस स्टँड परिसरात शिवशाही बसमध्ये तरूणीवर अत्याचार करणारा आरोपी अजूनही फरार होता. पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेण्यात येत होता. आरोपीला पकडून देणाऱ्या व्यक्तीला 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे पुणे पोलिसांनी जाहीर केले होते. भूक लागल्याने नातेवाईकांच्या घरी गेला अन् पकडला स्वारगेट येथील तरुणीवर अत्याचार करणारा दत्तात्रय गाडे गेल्या दोन दिवसापासून शिरूर तालुक्यातील गुनाट गावातील उसात लपून बसला होता. पोलिसांनी गुनाट गावात जवळपास 50 तास ऑपरेशन राबवले. मात्र तो सापडला नव्हता. अखेर भूक लागल्याने रात्री बाराच्या सुमारास तो गावातील एका नातेवाईकांच्या घरी गेला. तिथे त्याने मला प्रचंड भूक लागली असून काहीतरी खायला द्या, अशी मागणी केली. त्यानंतर नातेवाइकांनी त्याला खायला आणि पाण्याची बाटली दिली. त्याचवेळी दत्तात्रय गाडेने आपल्याला पश्चात्ताप झाला आहे, असे नातेवाईकांना सांगितले. तसेच जे काही केले ते चुकीचे आहे. मला पोलिसांना सरेंडर व्हायचंय, असे देखील तो म्हणाला. त्यानंतर पाण्याची बाटली घेऊन तो निघून गेला. त्याचवेळी नातेवाइकांनी पोलिसांना गाडे आल्याची माहिती दिली आणि त्यानंतर तो लगेचच पोलिसांना सापडला.