ऑस्ट्रेलियन संसदेत राजा चार्ल्स विरोधात घोषणाबाजी:खासदार म्हणाल्या- तुम्ही राजा नसून आमच्या जनतेचे खुनी; किंग झाल्यानंतरचा पहिला परदेश दौरा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेले ब्रिटनचे राजे चार्ल्स यांना विरोधाचा सामना करावा लागला आहे. किंग चार्ल्स सोमवारी ऑस्ट्रेलियन संसदेत भाषण देण्यासाठी पोहोचले होते. यावेळी एका स्थानिक सिनेटरने त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत तुम्ही आमचे राजा नाही, असे सांगितले. सिनेटर लिडिया थॉर्प म्हणाल्या, तू खुनी आहेस, तू आमच्या लोकांची कत्तल केलीस. या वेळी, लिडियांनी राजा चार्ल्सला त्यांच्या जमिनी, पूर्वजांच्या अस्थी आणि कलाकृती स्थानिकांना परत करण्यास सांगितले. ब्रिटीश साम्राज्याने आमची जमीन उद्ध्वस्त केली असे म्हणत लिडियांनी घोषणाबाजी केली. लिडिया पारंपरिक कपड्यांमध्ये पोहोचल्या होत्या राजा चार्ल्सच्या विरोधात उतरलेल्या लिडिया पारंपारिक कपडे परिधान करून संसदेत पोहोचल्या. घोषणाबाजी केल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांना संसदेबाहेर काढले. संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना लिडिया म्हणाल्या की, जोपर्यंत राजा ऑस्ट्रेलियाचा औपचारिक प्रमुख आहे, तोपर्यंत आम्ही ब्रिटीश साम्राज्याला विरोध करत राहू. त्या म्हणाल्या की, इतर कोणत्याही देशाचा राजा आम्हाला आदेश देऊ शकत नाही. लिडिया थॉर्प या ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्यातील स्वतंत्र सिनेटर आहेत. ब्रिटीश राजेशाहीच्या विरोधात बोलणाऱ्या म्हणून त्या ओळखल्या जातात. 2022 मध्ये सिनेटर म्हणून शपथ घेताना त्यांनी ब्रिटीश राजाला “औपनिवेशिक महाराज” असे संबोधले. यानंतर त्यांना पुन्हा शपथ घेण्यास सांगण्यात आले. कॅन्सरमधून बरे झाल्यानंतर किंग चार्ल्स त्यांच्या पहिल्या परदेश दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांची पत्नी राणी कॅमिलाही त्यांच्यासोबत आहे. 1986 मध्ये स्वातंत्र्य मिळाले, पण राजेशाही कायम आहे ऑस्ट्रेलियाला 1986 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. पण अजूनही तेथे घटनात्मक राजेशाही आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ब्रिटिश सम्राट औपचारिकपणे राज्याचा प्रमुख मानला जातो. तथापि, 1999 च्या सार्वमतामध्ये ऑस्ट्रेलियन जनतेने ऑस्ट्रेलियाला ब्रिटिश साम्राज्याचे अधिराज्य बनवण्याचा प्रस्ताव नाकारला. 2022 मध्ये राणी एलिझाबेथ II च्या मृत्यूनंतर, ब्रिटीश साम्राज्याशी संबंध तोडण्याच्या चर्चेला पुन्हा वेग आला आहे.

Share

-