खरिपाच्या पिकांवर पाणी:नुकसानीचे पंचनामे करून कर्जमाफी द्या, बोदवड तालुक्यातील विविध संघटनांसह शेतकऱ्यांची मागणी

बोदवड परतीचा पाऊस, वादळामुळे ऐन काढणीच्या वेळी खरीप पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे सामूहिक पंचनामे करून भरपाई देणे व १०० टक्के कर्जमाफी करावी, या मागणीसाठी विविध संघटनांनी सोमवारी नायब तहसीलदार बी.डी.पाटील व कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. बोदवड तालुक्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. आताही परतीच्या पावसामुळे ऐन काढणीच्या वेळी पिकांचे अतोनात नुकसान झाले. यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले गेले. या नुकसानीची भरपाई देण्यासह कर्ज मुक्तीच्या मागणीसाठी तहसील व कृषी कार्यालयात विविध संघटनांनी निवेदन दिले. काढणीच्यावेळी पिके मातीमोल झाल्याने खरीप हंगामासाठी काढलेले कर्ज कसे फेडावे? याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. शिवाय कुटुंबाचा उदरनिर्वाह प्रश्न बिकट आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने नुकसानीचे सामूहिक पंचनामे करावे, अशी मागणी पुढे आली. निवेदन देताना संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष अतुल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष आबा पाटील, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पिंटू पाटील, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख प्रमोद धामोडे, तुषार उगले, सागर कुकडे आदी उपस्थित होते. सरकारने दखल घ्यावी, अशी मागणी सर्वांनी केली. काढून ठेवलेला मका, वेचणीवरील कापूस भिजला १३ ऑक्टोबरला बोदवड मंडळात १५, साळशिंगी १०, नाडगाव ३० व शेलवड मंडळात २२ असा एकूण ७७ मिमी आणि सरासरी १९.२५ मिमी पाऊस झाला. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत ६३८.८० असा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची माहिती नायब तहसीलदार बी.डी.पाटील यांनी दिली. आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेला मका पूर्णपणे ओला झाला. वेचणीवर आलेल्या कापसाचे नुकसान झाले.

Share

-