बीड गोळीबार प्रकरणातील आरोपी आमदाराचा समर्थक:संतोष देशमुख खून प्रकरणी आमदाराची पण चौकशी करा, योगेश क्षीरसागर यांची मागणी

जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, म्हणत बोंब ठोकणाऱ्या बीडच्या आमदाराशी संबंधित व्यक्ती गोळीबार प्रकरणात आरोपी आहे. अशी प्रकरणे बीड विधानसभा मतदारसंघात आमदाराच्या वरदहस्तामुळे सातत्याने घडत आहेत. त्यामुळे गोळीबार प्रकरणाची सखोल चौकशी करून आमदाराला सहआरोपी करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे. पत्रकात पुढे म्हटले आहे की, मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींना अटक करून कडक कारवाई करावी ही आपली सुरुवातीपासूनच भूमिका आहे. या प्रकरणात बीडच्या आमदाराने राजकारण करत राजकीय भांडवल होईल, अशी विधाने केली. ती विधाने करण्याचा नैतिक अधिकार त्यांनी केव्हाच गमावलेला आहे. गत पाच वर्षात व्यापारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेल करण्यापलीकडे त्यांनी दुसरे काहीही केलेले नाही. मागे बीडमध्ये आदित्य कॉलेजजवळ झालेल्या खून प्रकरणात आमदाराचे जवळचे नातलग आरोपी आहेत. दोन-अडीच वर्षापूर्वी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ॲड.राजेंद्र राऊत यांच्यावर राजकीय दबावातून आमदारांनी खोटी ॲट्रॉसिटी व ३०७ सारखे गंभीर गुन्हे दाखल करायला लावले. माझ्यासह सहकाऱ्यांवर हनुमंत वाघमारे यांच्याकरवी करायला लावलेली ॲट्रॉसिटी देखील पूर्णपणे खोटी ठरली. तसेच सतीश पवार यांच्या संपत्तीच्या प्रकरणात वारंवार हस्तक्षेप करून आमदाराने खंडणी गोळा करण्यासाठी गुंड पाठविले. त्यावेळी रजिष्ट्री कार्यालयात हल्ला घडवून आणला, त्यावेळी आत्मसंरक्षणासाठी परवानाधारक शस्त्रातून सतीश पवारांना हवेत गोळीबार करावा लागला, हा इतका मोठा वाद आमदारांनी निर्माण केला. अशा खोट्या केसेस करण्यासाठी काही दलित बांधवांना हाताशी धरून त्यांचा वापर केला जातो. त्यामुळे समाजात तेढ निर्माण होते. हा आमदाराचा इतिहास पाहता बीडच्या गोळीबार प्रकरणात देखील त्यांचा हात असू शकतो, आरोपी हा त्यांच्याशी संबंधित व्यक्ती आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचे धडे शिकविणाऱ्या बीडच्या आमदाराची देखील कसून चौकशी व्हायला हवी, अशी मागणी डॉ. योगेश क्षीरसागर यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. मस्साजोग खून प्रकरणाचे राजकारण करू नये; पवनचक्की प्रकरणात चौकशी कराच केज तालुक्यातील मस्साजोग खून प्रकरणाचे बीडच्या आमदाराने राजकरण करू नये. आरोपींसोबतचे माझे फोटो व्हायरल करून खोटे आरोप केले जात आहे. माझी कोणतीही चौकशी करावी, मी कसल्याही चौकशीसाठी तयार आहे. यात माझा कुठेही संबंध आढळून आल्यास राजकीय संन्यास घेईल. परंतु बीडमध्ये आमदाराचा वरदहस्त असल्यामुळे पवनचक्की कंपन्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांची पिळवणूक केली आहे. त्यामुळे पवनचक्कीच्या प्रकरणात बीडच्या आमदाराचीही कसून चौकशी व्हावी. कॉल डिटेल्स तपासवेत. त्यासाठी ते तयार आहेत का? हे बगलबच्चांनी आमदाराला विचारून स्पष्ट करावे. याबाबत आमदाराने मीडियासमोर पुढे येऊन बोलण्याची तयारी दाखवावी, असे आव्हान डॉ.योगेश क्षीरसागर यांनी दिले आहे.

Share