सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंत्यास शिवीगाळ अन् धमकी:चौघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंत्यास मार्क आऊट देण्याच्या कारणावरून उप अभियंत्यास शिवीगाळ करून धमकी देणाऱ्या परभणी येथील चौघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. 10 गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील साखरा ते जयपूर या रस्त्याचे काम मंजूर झाले होते. या कामांसाठी सुमारे 45 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम उपविभागाने या कामाचे अंदाज पत्रक तयार करून त्याच्या निवीदा देखील काढल्या होत्या. सदर निवीदेमध्ये नांदेड येथील कंत्राटदारास कंत्राट मिळाले होते. त्यानुसार बांधकाम उपविभागाने कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देखील दिले होते. मात्र कार्यारंभ आदेश देऊन सुमारे पाच महिन्याचा कालावधी लोटला तरी सदरील कामाला सुरवात झालीच नाही. त्यामुळे उप अभिंयता माधव देशमुख यांनी संबंधित कंत्राटदारास नोटीस पाठवून काम का सुरु केले नाही तसेच काम रद्द का करण्यात येऊ नये याचा खुलासा मागविला होता. दरम्यान, उपअभियंता देशमुख हे बुधवारी ता. 9 कामकाज करीत असतांना परभणी येथील शेख वाजीद व अन्य तिघे जण तेथे आले. तुम्ही कार्यारंभ आदेश दिलेल्या कामाचे मार्क आऊट का दिले नाही अशी विचारणा करून आत्ताच मार्क आऊट द्या असे म्हणत शिवीगाळ केली तसेच तुम्हाला बघुन घेतो अशी धमकीही दिली. या प्रकरणी उप अभियंता देशमुख यांनी आज हिंगोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी शेख वाजीद याच्यासह चौघांवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, जमादार पोटे, संजय मार्के पुढील तपास करीत आहेत.

Share

-