देवेंद्र फडणवीस यांचा असाही विक्रम:मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्री झालेले तर उपमुख्यमंत्र्यांचे पुन्हा मुख्यमंत्री होणारे देखील पहिलेच

मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर लिहिला जात असताना उपमुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत. या आधी मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्री पदावर काम करणारे देखील देवेंद्र फडणवीस हे पहिलेच नेते आहेत. त्यामुळे आतापर्यंतची परंपरा मोडीत काढली जात असल्याचे बोलले जात आहे. उपमुख्यमंत्री पदावर काम केल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री पद भूषवण्याची संधी आजपर्यंत कोणत्याच नेत्याला मिळाली नव्हती. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी उपमुख्यमंत्री पदावर काम केलेले आहे. त्यामध्ये नासिकराव तिरपुडे, सुंदरराव सोळंके, रामराव आदिक, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते-पाटील, आर. आर. पाटील, देवेंद्र फडणवीस, अजित पवार या नावांचा समावेश आहे. या नेत्यांची मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची इच्छाही आजपर्यंत अपूर्णच राहिलेली आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी ही परंपरा मोडीत काढत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. उपमुख्यमंत्री पदी काम केल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पद भूषवणार आहेत. तिसऱ्यांदा मुख्यमंत्री एकापेक्षा जास्त काळ मुख्यमंत्री पद भूषवणाऱ्या नेत्यांच्या यादीत देखील देवेंद्र फडणवीस यांनी स्थान मिळवले आहे. आतापर्यंत वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण, विलासराव देशमुख आणि शरद पवार यांनी एकपेक्षा जास्त वेळा मुख्यमंत्रीपद भुषवले आहे. मात्र आता या यादीत देवेंद्र फडणवीस यांचे देखील नाव घ्यावे लागेल. वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील यांनी तीन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. त्यात आता देवेंद्र फडणवीस हे देखील तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. सर्वात कमी काळाचा विक्रम देखील त्यांच्याच नावावर भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली असून ते तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. मात्र 2014 ते 19 या काळात ते पूर्णवेळ मुख्यमंत्री पदी राहिले होते. 2019 मध्ये त्यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीनंतर अवघ्या काही तासातच त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे सर्वात कमी कालावधीसाठीचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याच नावावर विक्रम प्रस्थापित झालेला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा…. फडणवीस पर्व 3.0:देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार; महायुतीच्या विजयाच्या शिल्पकाराचा राजकीय प्रवास महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. तर भाजप 132 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 5 डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. यात आता भाजपचे नेते आणि या विधानसभा निवडणुकीतील खऱ्या अर्थाने शिल्पकार म्हणवले जाणारे देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात फडणवीस पर्व 3.0 सुरु होईल. पूर्ण बातमी वाचा….

Share