धामणगावात 5 उमेदवारांच्या खर्चात तफावत:नोटीस जारी प्रमुख पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश, सोमवारपर्यंत देणार उत्तर

धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील पाच उमेदवारांच्या खर्चात तफावत आढळून आल्याने निवडणूक यंत्रणेने त्यांना नोटीस जारी केली असून ४८ तासांच्या आंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये मविआ, महायुती, वंचित बहुजन आघाडी आणि दोन अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. निवडणूक आयोगातर्फे जिल्ह्यात दाखल झालेल्या खर्चविषयक निरीक्षकांच्या उपस्थितीत या मतदारसंघातील सर्व २४ उमेदवारांच्या खर्चाची पडताळणी करण्यात आली. यावेळी उमेदवारांनी सादर केलेला खर्च आणि निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या दरानुसार निवडणूक यंत्रणेच्या नोंदीनुसार झालेला खर्च (शॅडो रजिस्टर) यात अठराशे रुपयांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंतचा फरक दिसून आला. त्यामुळे पाचही उमेदवारांना नोटीस जारी करुन ४८ तासांच्या आंत त्यांची बाजू स्पष्ट करण्याचे सूचविण्यात आले आहे. खर्च तपासणीवेळी खर्च निरीक्षक वेंकन्ना तेजावथ आणि त्यांचे इतर सहकारी अधिकारी उपस्थित होते. तर दुसरीकडे खर्च सादर करण्याकरिता काही उमेदवार स्वत: तर काही उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित झाले होते. चांदूररेल्वे येथील तहसिल कार्यालयात हसी तपासणी करण्यात आली. दरम्यान विधानसभा निवडणुका शांततापूर्ण, भयमुक्त आणि पारदर्शकरित्या पार पाडण्यासाठी उमेदवारांनी सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. त्याचवे‌ळी निरीक्षकांच्या सूचनेनुसार शॅडो खर्चाच्या नोंदवहित नोंदविलेल्या खर्चाशी मेळ नसलेल्या खर्चाबाबत उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी तेजश्री कोरे यांनी नोटीस बजावली आहे. नोटीस प्राप्त झाल्यापासून ४८ तासांच्या आत म्हणणे लेखी स्वरुपात निवडणूक संनियंत्रण कक्ष, तहसिल कार्यालय, चांदुर रेल्वे येथे सादर करावे लागणार आहे. म्हणणे सादर केले नसल्यास सदर आक्षेप घेतलेला खर्च नोंदवहीनुसार उमेदवारांच्या निवडणूक खर्चामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. तसेच नियमानुसार कार्यवाहीही करण्यात येणार आहे. आणखी दोनदा पडताळणी निवडणूक खर्चात तफावत आढळलेली ही पहिलीच पडताळणी होती. यानंतर पुन्हा दोनदा अशीच पडताळणी केली जाणार असून निकाल घोषित झाल्यानंतर अंतीम पडताळणी केली जाईल. त्यानंतर सर्व उमेदवारांचे लेखे निवडणूक आयोगाकडे सादर केले जाणार आहे.

Share

-