धनंजय महाडिकांचा माफीनामा:म्हणाले – माझ्या विधानामुळे माता-भगिनींचे मन दुखावले असेल तर बिनशर्त माफी मागतो

भाजपचे खासदार धनंजय महाडीक यांनी लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना वादग्रस्त विधान केले होते. त्या विधानावरून आता धनंजय महाडीक यांनी जाहीर माफी मागितली आहे. माझे हे वक्तव्य कुठल्याही माता भगिनीचा अपमान करण्यासाठी मुळीच नव्हते माझ्या वक्तव्याने कुठल्याही माता भगिनींचे मन दुखावले असेल तर त्यांची मी बिनशर्त माफी मागतो, असे म्हणत महाडीक यांनी वादग्रस्त वक्तव्याबद्दल सोशल मीडियावरून जाहीर माफी मागितली आहे. धनंजय महाडिक यांची सोशल मीडिया पोस्ट धनंजय महाडीक यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले, सर्वप्रथम माझ्या वक्तव्याने कुठल्याही माता भगिनींचे मन दुखावले असेल तर त्यांची मी बिनशर्त माफी मागतो. माझे हे वक्तव्य कुठल्याही माता भगिनीचा अपमान करण्यासाठी मुळीच नव्हते. तर निवडणूक काळात राजकीय प्रचार करताना विरोधी पक्षाच्या खोट्या प्रचाराला बळी पडणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजना ही फक्त महायुती सरकारमुळेच यशस्वी झाली असल्याचे ठामपणे नमूद करताना विशेषत: वोट जिहाद करणाऱ्या महिलांच्या प्रती आलेली स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. मी माझ्या वैयक्तिक, राजकीय आयुष्यात महिलांचा नेहमीच सन्मान करत आलेलो आहे. मी आणि माझ्या पत्नीमार्फत गेली अनेक वर्षे भगीरथी महिला संस्थेमार्फत महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी नेहमीच चांगले काम करत आलो आहे आणि ह्या पुढे देखील करत राहीन. महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरणबाबत माझ्या ह्या प्रयत्नांची दखल घेऊन माझ्या वक्तव्याने मन दुखावलेल्या माझ्या भगिनी मला मोठ्या मनाने माफ करतील, अशी आई अंबाबाई चरणी मी प्रार्थना करतो, असेही महाडीक यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. काय म्हणाले होते धनंजय महाडीक?
लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये घेणाऱ्या महिला कॉंग्रेसच्या रॅलीमध्ये दिसल्या तर त्यांचा फोटो काढून घ्या, नाव लिहून घ्या. त्यांची व्यवस्था करतो, असे धनंजय महाडीक म्हणाले होते. घ्यायचे आपल्या शासनाचे आणि गायचे त्यांचे असे चालणार नाही. अनेक ताया आहेत, महाराष्ट्रात छाती बडवत आहेत. आम्हाला पैसे नको सुरक्षा पाहिजे म्हणत आहेत. असे विधान कोल्हापूरच्या प्रचार सभेत बोलताना महाडिक यांनी केले होते. विरोधकांनी उठवली टीकेची झोड
दरम्यान, धनंजय महाडीक यांच्या या विधानानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपये घेणाऱ्या महिलांवर पाळत ठेवण्याचे भाजपचे आदेश दिलेत, असे म्हणत महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेची किंमत भाजपने लावली फक्त 1500 रुपये? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला. सत्तेची मस्ती भाजपवाल्यांच्या डोक्यात किती चढली आहे हे महाराष्ट्र बघतोय, आमच्या आया बहिणीना भाजप पासूनच धोका आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

Share

-