दिव्य मराठी विशेष:रात्र होताच उदासी… ही वैफल्यस्थिती नव्हे, कारण-एकटेपणा, दिनचर्येत बिघाड होणे, रात्री 3 वाजता जास्त नकारात्मकता

रात्र होताच मूड खराब होतो, नैराश्याच्या भावना दाटून येतात. तुम्ही उदासपणात बुडून जाता. या स्थितीला साेशल मीडियावर तसेच काही देशांत ‘नाइट डिप्रेशन’ म्हटले जाते. नकारात्मक विचारांचा हा अंधार मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी हानिकारक आहे. परंतु तज्ज्ञांना ही वैफल्यग्रस्त स्थिती वाटत नाही. असे का होते, हे जाणून घेतल्यानंतर योग्य पावले उचलण्यासाठी मदत होऊ शकते. चला तर झोपताना येणाऱ्या या उदासी भावनेशी कसे तोंड द्यायचे हे समजून घेऊया…
काय आहे धोका : रटगर्स विद्यापीठात सायकॉलॉजीचे क्लिनिकल प्रोफेसर व अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशनच्या भावी अध्यक्ष डॉ. थेरेसा मिस्किमेन रिव्हेरा म्हणाल्या, निराशेमुळे लोक उत्तेजित, तणावग्रस्त, अस्वस्थता अनुभवतात. झोप येत नाही. त्याचा परिणाम आरोग्यावर दिसतो. रात्रपाळीत काम करणाऱ्यांवर नियमित व्यावसायिक तासांपेक्षा जास्त काम केल्याने आरोग्य समस्येव्यतिरिक्त वैफल्य-चिंता वाढण्याचा धोका वाढतो. कारण : अनिद्रा, एकटेपणा, मद्य-ड्रग्ज हे त्यामागील कारणे असू शकतात, असे रिव्हेराने म्हटले आहे. आपल्या बॉडी क्लॉकचीदेखील प्रमुख भूमिका असू शकते. बॉडी क्लॉक दिवस-रात्रीच्या बदलत्या वेळेनुसार भूक, निद्रेला नियंत्रित करण्यास मदत करते. हीच यंत्रणा शरीराचे तापमान, संप्रेरक पातळी व रोगप्रतिकारशक्ती संतुलित करते. म्हणजे क्लॉक झोप व जागरण चक्रानुसार नसल्यास भावस्थितीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याशिवाय खूप जास्त कॉफी पिणे किंवा झोपण्यापूर्वी जास्त आहार घेणे हेदेखील कारण असू शकते. परिवर्तनातून सुरुवात : साउथम्प्टन विद्यापीठातील मानसतज्ज्ञ डॉ. साला एल. चेलप्पा यापासून संरक्षणासाठी वेळेवर झोप-जागे होणे, दिवस झोप टाळणे आणि झोपेच्या तासभर आधी गॅजेटपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. हे लक्षात ठेवा : आेरेगन विद्यापीठात मानसतज्ज्ञ डॉ. अल्फ्रेड जे. लेव्ही म्हणाले, रात्रीच्या वेळी कोणताही निर्णय घेणे टाळावे. कमी गंभीर गोष्टींकडे लक्ष द्यावे. मनातील विचार कागदावर मांडा, सुधारणा नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. भीती, चिडचिडेपणा असल्यास डॉक्टरांना भेटा…
डॉ. रिव्हेरा म्हणाल्या, २१ निरोगी वयस्करांवर केलेल्या अध्ययनात चार तासांच्या अंतराने केलेल्या सकारात्मक व नकारात्मक भावनांचे मोजमाप केले गेले. त्यानुसार नकारात्मक भावना मध्यरात्री सुमारे ३ वाजता उच्च स्तरावर असतात. रिव्हेला म्हणाल्या, उदासीसोबत भीती, चिडचिडेपणा, आवेग किंवा आत्महत्येचे विचारही येतात. तेव्हा तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा.

Share

-