दिव्य मराठी अपडेट्स:विधानसभेसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरवात, उमेदवारांकडे फक्त सहा दिवस

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स आघाडीतील वाद मिटवण्यासाठी काँग्रेसची थोरातांकडे जबाबदारी मुंबई – महाविकास आघाडीतील मित्रपक्ष उद्धवसेना व काँग्रेस यांच्यात विदर्भ व मुंबईतील काही जागांवरून पेटलेला वाद टोकाला गेला आहे. मुंबईत समन्वय समितीच्या अनेक बैठका होऊनही त्यावर तोडगा निघत नाही. त्यामुळे निवडणूक जाहीर होऊन 5 दिवस उलटले तरी अजून जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करता आलेला नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत हे दाेघेही आक्रमक होत असल्याने तणातणी होत असल्याने चर्चा पुढे जात नाहीय. या पार्श्वभूमीवर सोमवारी दिल्लीत काँग्रेसच्या केंद्रीय समितीची बैठक झाली. त्यात उद्धवसेना व शरद पवारांशी समन्वयाची जबाबदारी आता ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवण्यात आली. दरम्यान, काँग्रेसची पहिली यादी मंगळवारी येणार असल्याचे नाना पटोलेंनी सांगितले. शिंदेसेना पुणे शहराध्यक्षाच्या हडपसरच्या तिकिटासाठी पुणे ते वर्षापर्यंत पायी वारी पुणे – अजितदादा गटाकडील हडपसर विधानसभा मतदारसंघ शिंदेसेनेकडे खेचावा आणि पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांना उमेदवारी देण्यात यावी या मागणीसाठी कार्यकर्ते पुण्यातून पायी निघाले आहेत. मंगळवारी ते मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षावर पोहोचणार आहेत. कार्यकर्त्यांनी सांगितले की, सध्या हडपसरमध्ये अजितदादा गटाचे चेतन तुपे आमदार आहेत. त्यांच्याविरुद्ध शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, उद्धवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर आहेत. मविआतील वादाचा फायदा शिंदेसेनेला होऊ शकतो. मनोज जरांगे यांनी शरदचंद्र पवार गटात तातडीने प्रवेश करावा : लक्ष्मण हाके पुणे – मनोज जरांगेंनी ताकाला जाऊन भांडे लपवू नये. त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करावा. 50 उमेदवार उभे करावेत, असे आव्हान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिले आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मनाेज जरांगेंना पाठिंबा देणाऱ्यांना या वेळी अाेबीसी मतदार मतदान करणार नाहीत. मागील सहा ते सात महिने जरांगे महाराष्ट्र म्हणजे अाम्ही अशा अाविर्भावात वावरत आहेत. दुसऱ्यांच्या पाडापाडीची भाषा करणाऱ्यांना उमेदवारदेखील मिळत नाही. त्यांनी सुपारी घेणे बंद करावे. त्यांना मागील अाठवड्यात काेण काेण भेटले हे अाम्हाला माहिती अाहे. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मनसेचे 2 उमेदवार घोषित मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात दोन उमेदवारांची घोषणा केली. मनसेचे एकमेव आमदार असलेले प्रमोद ऊर्फ राजू पाटील यांना पुन्हा कल्याण ग्रामीण मतदारसंघातून तर ठाण्यातून अविनाश जाधव यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली.2019 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे कल्याण ग्रामीण या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यांच्या 2024 च्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. त्या वेळी राज यांनी राजू पाटील आणि अविनाश जाधव यांच्या उमेदवारीची घोषणा केली. या वेळी राज म्हणाले की, उमेदवारांच्या यादीवर शेवटचा हात फिरवला जातोय. आज किंवा उद्या उमेदवारांची यादी जाहीर होईल. यापूर्वीच मनसेने शिवडीतून बाळा नांदगावकर आणि पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांच्या नावांची घोषणा केली आहे. अमित ठाकरे कुठून लढणार याविषयी उत्सुकता आहे. बीएचआर ठेवी वाटपासह कर्जवसुलीचे काम ठप्प जळगाव – दीड लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी बीएचआर पतसंस्थेच्या अवसायक चैतन्य नासरेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाईला दीड महिना झाला. त्यानंतरही या संस्थेवर प्रभारी अवसायकाची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे ठेवीदारांना ठेवी परत करण्यासह कर्जवसुलीचे काम ठप्प झाले आहे. नासरे याला एसीबीच्या पथकाने 3 सप्टेंबर रोजी दीड लाखांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात घेतल्यानंतर पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. त्याबाबत एसीबीकडून केंद्रीय सहकार खात्याला अहवाल पाठवलेला आहे. बीएचआर ही मल्टिस्टेट संस्था असल्याने केंद्रीय सहकार खात्याच्या अखत्यारीत असून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. ठाण्यात मर्सिडीजच्या धडकेत तरुण ठार ठाणे – ठाण्यात ‘हिट अँड रन’चा प्रकार समोर आला आहे. एका मर्सिडीज कारच्या धडकेत दर्शन हेगडे (21) याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. वागळे इस्टेट येथील कामगार रुग्णालय परिसरात दर्शन हेगडे हा वास्तव्यास होता. सोमवारी मध्यरात्री तो दुचाकीने खाद्यपदार्थ आणण्यासाठी निघाला होता. मध्यरात्री 1.50 वाजताच्या सुमारास तो नितीन कंपनी जंक्शन परिसरात आला असता, एका भरधाव मर्सिडीज कारमधील चालकाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. केंद्रीय कर्मचारी 20 वर्षांच्या सेवेनंतर घेऊ शकतील व्हीआरएस नवी दिल्ली – केंद्रीय कर्मचारी आता 20 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर व्हीआरएसचा (स्वैच्छिक सेवानिवृत्ती) पर्याय निवडू शकतील. असे केल्याने त्यांना नॅशनल पेन्शन सिस्टिमचे (एनपीएस) नियमित निवृत्तीनंतर मिळणारे समान लाभ मिळतील. पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने यासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, 20 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर व्हीआरएस घेऊ इच्छिणाऱ्यांना तीन महिन्यांची लेखी नोटीस द्यावी लागणार आहे. या कालावधीत नियुक्ती अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज अमान्य केला नाही तर नोटीस कालावधी संपल्यानंतर कर्मचारी स्वतःहून निवृत्त होऊ शकतो. बिष्णोई टोळीच्या नावानेपुण्यात पत्रकारास धमकी पुणे- मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची शूटरमार्फत गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यानंतर लॉरेन्स बिष्णोई टोळी चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर एक बनावट खाते सुरू करून गुंड लॉरेन्स बिष्णोईच्या नावे पुण्यातील 40 वर्षीय पत्रकाराला जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पत्रकाराने फिर्याद दिली असून सुमीत दादा घुले पाटील नावाच्या खात्यावरून धमकी देण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. केजरीवाल यांच्याविरुद्ध समन्सला स्थगिती नाही नवी दिल्ली – दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध फौजदारी मानहानीचा खटला सुरूच राहणार आहे. केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीबाबत केलेल्या कथित टिप्पणीवरून त्यांच्याविरुद्ध जारी केलेले समन्स रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या आणखी एका खंडपीठाने 8 एप्रिल रोजी याच प्रकरणी आपचे खासदार संजय सिंह यांनी दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. संजय सिंह प्रकरणाचा संदर्भ देत न्या. हृषिकेश रॉय व न्या. एसव्हीएन भाटी यांचे खंडपीठ म्हणाले, न्यायालयालाही असाच दृष्टिकोन ठेवावा लागेल. रेल्वेत पांघरूण महिन्यातएक वेळा धुतले जातात नवी दिल्ली – रेल्वेत प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या चादरी वापराच्या एक महिन्यानंतर धुतल्या जातात. उलनचे पांघरूण सुविधेनुसार महिन्यातून एक किंवा दाेन वेळा धुतले जाते. पांघरुणाला वास येत असेल किंवा डाग असल्यास ते लाँड्रीला पाठवतात, असे रेल्वेने आरटीआयमध्ये स्पष्ट केले. नीट- सुधारणा अहवाल- 2 आठवडे मुदतवाढ दिल्ली – सुप्रीम कोर्टाने परीक्षेसंबंधी सुधारणांवर अहवालासाठी केंद्राद्वारे नियुक्त समितीला दाेन आठवड्यांची मुदत वाढ दिली. काेर्टाने नीट-यूजी 2024 परीक्षा रद्द करण्यास नकार देत समितीचा विस्तार केला हाेता. ही समिती एनटीएच्या कामाचाही आढावा घेईल.

Share

-