दिव्य मराठी अपडेट्स:18 ते 20 नोव्हेंबरदरम्यान शाळांना सरसकट सुटी नाही; स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना
नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स शाळांना तीन दिवस सुटी नाही – शिक्षण आयुक्त जळगाव – विधानसभा निवडणुकीमुळे 18 ते 20 नोव्हेंबरदरम्यान शाळांना सुटी देण्यात यावी, असा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला होता. तो शासनाने मंजूर केला आहे. मात्र, या निर्णयानंतर शाळा आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यावर ही सरसकट सार्वजनिक सुटी नसून मुख्याध्यापकांनी आपापल्या स्तरावर निर्णय घ्यायचा आहे, राज्य शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे. ज्या शाळांमधील सर्व शिक्षकांनी निवडणूक कामासाठी नियुक्ती झाली आहे अशा शाळांना 18 नोव्हेंबर रोजी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन सुटी देण्यात यावी. उर्वरीत शाळा नियमितपणे सुरू राहतील,असे त्यांनी सांगितले. समाधी सोहळा, पांडुरंगाच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान पंढरपूर – श्री संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्यासाठी मंदिर समितीच्या श्री विठ्ठलाच्या पादुकाचे प्रस्थान शनिवारी झाले. सुरुवातीला कार्तिक शुद्ध पौर्णिमेनिमित्त गोपाळपूर येथे गोपाळकाला झाला. संतांच्या दिंड्या मार्गस्थ झाल्या व कार्तिकी यात्रेची सांगता झाली. परंपरेनुसार श्रींच्या पालखीची नगर प्रदक्षिणा झाली. या वेळी श्रींच्या पालखीचे अाबालवृद्ध, अनाथ, दुर्बल, भाविकांनी दर्शन घेतले. 24 नोव्हेंबर रोजी आळंदी येथे पादुका रथ पोहोचणार असून त्यानंतर दुसऱ्या दिवशी इंद्रायणी स्नान, पालखी प्रदक्षिणा, द्वादशी खिरापत व 28 नोव्हेंबर रोजी श्री संत ज्ञानोबाराय संजीवन समाधी सोहळा होत आहे. या वेळी भाविकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यूपीच्या मंत्र्याला 2 कोटींना गंडवले लखनऊ – उत्तर प्रदेशचे मंत्री नंद गोपाल ‘नंदी’ यांना सायबर ठकांनी चुना लावला आहे. नंदी यांचे अकाउंटंट रितेश श्रीवास्तव यांच्यामार्फत 2.08 कोटी रुपये हस्तांतरित करून घेतले. ही घटना बुधवारची आहे. श्रीवास्तव यांच्या मोबाइल क्रमांकावर एका अज्ञात क्रमांकावरून व्हॉट्सअॅप मेसेज आला होता. मी महत्त्वाच्या उद्योग बैठकीत आहे. वेळ लागू शकतो. हा माझा नवीन नंबर असून तत्काळ पैसे पाठवावेत, असे त्यात नमूद केले होते. व्हॉट्सअॅप नंबरच्या डीपीवर नंदी यांच्या मुलाचा फोटो होता. त्यामुळे अकाउंटंटला तो नंबर मंत्रिपुत्राचा आहे, असे वाटले. त्यानंतर त्यांनी काहीही विचार न करता तीन बँक खात्यांत 2.08 काेटी रुपये पाठवून दिले. कोल्हापूर, शिर्डीजवळील साकोरी येथे आज प्रियंका गांधी यांची जाहीर सभा कोल्हापूर – मतदानाला तीन दिवस बाकी असताना कोल्हापुरात प्रियंका गांधी यांची शनिवारी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी एक वाजता गांधी मैदान येथे ही सभा होणार आहे. तत्पूर्वी त्यांची सभा शिर्डीजवळील साकोरी गावात होणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेश कार्यालयातून देण्यात आली आहे. नांदगाव मतदारसंघातील मनसे उमेदवाराचा उद्धवसेनेला पाठिंबा नांदगाव – नांदगाव मतदारसंघातील मनसेचे उमेदवार, माजी नगरसेविकेचे पती अकबर सोनावाला यांनी उद्धवसेनेचे उमेदवार गणेश धात्रक यांना पाठिंबा जाहीर केला आहे. उमेदवारी माघारीचे कारण त्यांनी दिलेले नाही. मात्र, महायुतीचे उमेदवार सुहास कांदे यांची कोंडी करण्यासाठी त्यांनी हा पवित्रा घेतल्याचे म्हटले जात आहे. दिल्ली-मुंबई विमानात हार्ट अटॅक, डाॅक्टरांमुळे वाचले प्रवाशाचे प्राण मुंबई – दिल्ली-मुंबई विमानात शुक्रवारी एका प्रवाशाला ह्रदयविकाराचा झटका आला. त्याच विमानात असलेल्या डाॅक्टरांनी तत्काळ देखभाल केल्याने त्याचे प्राण वाचले. मुंबईत उतरण्यासाठी 45 मिनिटांचा अवधी हाेता. तेव्हा ही घटना घडली. इंडिगाे एअरलाइनचे प्रवक्ते म्हणाले, प्रवाशाला श्वास घेण्यास त्रास हाेत हाेता. टाटा माेटर्सचे डाॅ. प्रशांत भारद्वाज कामानिमित्ताने मुंबईला जात हाेते. त्यांना मदत मागणारा आवाज कानी पडला. कर्मचाऱ्यांनी विमानातील डाॅक्टरांना बाेलावले. त्यानंतर मी तत्काळ फर्स्ट एड बाॅक्स घेऊन काही आैषधींसह त्या प्रवाशाजवळ गेलाे. संपूर्ण विमान प्रवासात त्या प्रवाशाजवळ मी बसलाे हाेताे. असे भारद्वाज यांनी सांगितले. मणिपूर बेपत्तांचे धागेदोरे नाहीत, आंदोलन सुरूच इंफाळ – मणिपूरमध्ये जिरीबाम जिल्ह्याच्या बोरोब्रेका पोलिस ठाणे परिसरातील मदत छावणीतून गेल्या साेमवारी बेपत्ता लोकांच्या शोधाच्या मागणीवरून राज्याच्या वेगवेगळ्या भागांत आंदोलन होत आहे. त्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलांची टीम मोहीम चालवत आहे. मात्र, त्यात यश मिळत नसल्यामुळे लोकांमध्ये संताप वाढला आहे. आता अभियानाच्या निगराणीसाठी शुक्रवारी इंफाळमधून आयजी आणि डीआयजी दर्जाच्या अधिकाऱ्यांना जिरीबामला पाठवले आहे. गेल्या सोमवारी वर्दी घातलेले शस्त्रसज्ज बंडखोरांनी बोरोब्रेका ठाणे परिसर आणि सीआरपीएफ छावणीवर हल्ला केला होता. यादरम्यान, ठाणे मदत छावणीतून 8 लोक बेपत्ता झाले होते. तीन महिला आणि तीन मुले अद्यापही बेपत्ता आहेत. हल्ला करणाऱ्या बंडखोरांनी या महिला आणि मुलांचे अपहरण केल्याची शक्यता स्थानिक लोकांनी व्यक्त केली आहे. मारलेल्या लोकांच्या न्यायासाठी आंदोलन: कुकी समाजाशी संबंधित लोक चकमकीत मारलेल्या लोकांसाठी न्याय मागत आंदोलन करत आहेत.