डंकी मार्ग… 6 महिन्यांत 3 हजार श्रीलंकनांची भारतात घुसखोरी!:दक्षिणेकडील राज्यात स्थायिक, कॅनडातही प्रवेश
श्रीलंकेतून भारतात घुसखोरीचे नवीन पुरावे गुप्तचर संस्थांना सापडले आहेत. गुप्तचर यंत्रणांनी मानवी तस्करी टोळीचे काही फोन कॉल्स इंटरसेप्ट करत अटकही केली आहे. एनआयए व तामिळनाडू एटीएसच्या तपासात असे दिसून आले आहे की, गेल्या ६ महिन्यांत ३ हजारांहून अधिक श्रीलंकन नागरिकांनी भारतात बेकायदेशीरपणे घुसखोरी केली आहे. दक्षिण भारतातील कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांमध्ये श्रीलंकेचे लोक स्थायिक होत आहेत. मानवी तस्करी रॅकेटच्या मुख्य सूत्रधाराच्या चौकशीदरम्यान काही प्रकरणांमध्ये भारताला डंकी मार्ग बनवल्याचे उघड झाले. खोट्या ओळखी वापरून श्रीलंकेच्या लोकांनाही कॅनडाला पाठवले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मानवी तस्करीचे हे सिंडिकेट श्रीलंकेतील इम्रान हजियार चालवत आहे. भारतातील या मानवी तस्करी टोळीचा म्होरक्या मोहंमद इब्राहिमला २८ फेब्रुवारीच अटक केली. हा आहे डंकी मार्ग… नावेने थुथुकुडी, मग गोदामात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेतील या लोकांना मच्छीमारांच्या बोटींमधून तामिळनाडूतील थुथुकुडी येथील मंडपम येथे आणले जाते. इथे ते काही किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गोदामात नेले जाते. याला तस्कर होल्डिंग एरिया म्हणतात. नंतर त्यांना लहान बोटी व ट्रकमधून प्रत्येकी २० जणांच्या गटात तामिळनाडू आणि कर्नाटकच्या इतर भागात पाठवले जाते. त्यापैकी बहुतेक जण बंगळुरू, मंगलोर येथे स्थायिक झाले आहेत. भारतात घुसखोरीसाठी ते २० लाख रुपयांपर्यंत व कॅनडामध्ये प्रवेश करण्यासाठी ५० लाख रुपयांपर्यंत शुल्क आकारतात. कॅनडाला जाण्यासाठी भारतीय सांगून लाभ कॅनेडियन व्हिसा मिळवण्यासाठी श्रीलंका पसंतीच्या देशांच्या यादीत नाही. अशा परिस्थितीत श्रीलंकेचे लोक तिथे जाण्यासाठी स्वतःला भारतीय असल्याचे सांगतात. यासाठी भारताचा डंकी मार्ग वापरला जातो. मानवी तस्कर या लोकांना भारतीय कागदपत्रे पुरवतात. यामुळे त्यांचे भारतीय नागरिकत्व बळकट होते. हे श्रीलंकेचे लोक नंतर कॅनडामध्ये अभ्यास व्हिसा किंवा बनावट वर्क परमिट मिळवतात. मृतांच्या आधार कार्डद्वारे बोगस ओळखपत्र चेन्नई एटीएसने काही श्रीलंकन नागरिकांना पकडले. त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्वाशी संबंधित सर्व कागदपत्रे असल्याचे आढळून आले, परंतु तपासादरम्यान ते बनावट असल्याचे समोर आले. मानवी तस्करांनी त्यापैकी काहींना मृतांची ओळख दिली होती. मृतांचे आधार कार्ड अपडेट केले व त्यांचे फोटो बदलले. काही प्रकरणांमध्ये आधार कार्ड व मतदार ओळखपत्र यांसारखी बनावट कागदपत्रे तयार केल्याचेही समोर आले आहे.