काँग्रेसमध्ये असताना 14 वर्षे खूप सोसावे लागले:माझ्यामागे चारीही बाजूने हल्ले; अशोक चव्हाण यांचे बाळासोबत थोरात यांना प्रत्युत्तर

काँग्रेसमध्ये असताना 14 वर्षे आपल्याला खूप सोसावे लागले असल्याचे माजी मुख्यमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. सध्या माझ्यामागे चारीही बाजूने हल्ले होत आहेत. काँग्रेसचे सर्व नेते भोकर मध्ये तळ ठोकून आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री येथे येत आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते देखील याच मतदारसंघात आहेत. सर्व आमदार येथे तळ ठोकून आहेत. हे सर्व कशाकरता? सर्वांनी भोकरच का धरले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. भोकर विधानसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण या भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने देखील मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील नांदेड मतदार संघातून भाजपचा पराभव झाला होता. आता विधानसभेत देखील अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना पराभूत करण्याची रणनीती काँग्रेसने आखली असल्याचे दिसून येत आहे. यावर अशोक चव्हाण यांनी सडकून टीका केली. कुठलाही सामना हा कमजोर नसल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. निवडणुकीला युद्ध म्हणूनच लढले गेले पाहिजे, अशी भूमिका अशोक चव्हाण यांनी मांडली आहे. सध्या माझ्यावर सर्व बाजूंनी हल्ला होत असल्याचे देखील ते म्हणाले. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून अशोक चव्हाण हे भोकर मतदारसंघात तळ ठोकून आहेत. श्रीजया चव्हाण यांच्या विजयासाठी अशोक चव्हाण यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. आता मतदानाला केवळ सात दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी देखील प्रचाराचा वेग वाढवला आहे. बाळासोबत थोरात यांनाही प्रत्युत्तर अशोक चव्हाण यांनी त्यांचे राजकारण स्वतःच्या हाताने संपवले असल्याचा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांना देखील चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मला संपवण्याचा प्रश्नच येत नाही. मी जे काही केले ते योग्यच केले असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. काँग्रेसमध्ये असताना मी खूप काही सोसले आहे. माझ्यावर बिनबुडाचे आरोप झाले. माझ्यामागे कोर्ट कचेरी लागली. ते मी सर्व सहन केले असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

Share