आर्थिक उलाढालीचा परिणाम निवडणुकीवर होणार:सरकार स्थिर राहील की नाही याची खात्री नाही, एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान नुकतेच पार पडले आहे. तसेच आता 23 तारखेला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आता सरकार कोणाचे येणार यावर तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यात महायुतीकडून सरकार आपलेच होणार असल्याचा दावा केला जात आहे, तर महाविकास आघाडीने देखील सरकार स्थापनेचा दावा केला आहे. यात आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील आर्थिक उलाढालीचा परिणाम निवडणुकीवर झाला असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले आहेत. ज्यांनी ज्यांनी अधिकाधिक आर्थिक व्यवहार केला त्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसले. काही ठिकाणी आर्थिक व्यवहार झालेही असतील पण लोकांनी ते नाकारले. पण साधारणतः आर्थिक उलाढाल जी झाली, त्या उलाढालीचा परिणाम निवडणुकीवर दिसेल, असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. महाविकास आघाडी किंवा महायुती दोघांनाही या ठिकाणी जर स्पष्ट बहुमत जर नाही आले तर अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापनेचा दावा होऊ शकतो. कोणाचेही सरकार आले तरी ते स्थिर राहील की नाही याची खात्री देता येत नाही, असेही एकनाथ खडसे म्हणाले आहेत. पुढील निवडणूक मी पाहणार की नाही, ते परमेश्वर ठरवेल
दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या प्रचारार्थ एकनाथ खडसे यांनी मतदारसंघात प्रचार देखील केला. तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा देखील त्यांनी प्रचार केला होता. आता तब्येतीचे कारण देत दगदग सहन होत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. पुढील निवडणूक मी पाहणार की नाही, ते परमेश्वर ठरवेल, असेही एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. त्यामुळे एकनाथ खडसे राजकीय संन्यास घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे.

Share

-