शेतामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करणे काळसुसंगत:डॉ. आर. सी. अग्रवाल यांचे प्रतिपादन, “पीडीकेव्ही’ ५६ वा स्थापना दिन उत्साहात साजरा‎

‘आपल्या देशाची लोकसंख्या लक्षात घेता भविष्यात शेती क्षेत्रालाच अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार असून, पर्यायाने कृषी विद्यापीठांची व्याप्ती अधिकच वाढणार असल्याने शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (ए.आय.) प्रभावी वापर अधिक लाभदायक ठरेल, असे प्रतिपादन भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीचे उपमहासंचालक डॉ. आर. सी. अग्रवाल यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ५६ वा स्थापना दिन रविवारी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात उत्साहात झाला. नवीन शैक्षणिक धोरणाने कृषी क्षेत्राला नव दिशा देण्याचा प्रयत्न केला असेही डॉ. अग्रवाल म्हणाले. आगामी काळात कृषी विद्यापीठाला देशभरातील अग्रगण्य दहा कृषी विद्यापीठांमध्ये स्थान मिळवण्यासाठी विद्यापीठातील सर्व घटक कृतिशील असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी सांगितले. याप्रसंगी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ.विलास खर्चे, संचालक शिक्षण डॉ. श्यामसुंदर माने, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. देवानंद पंचभाई, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे, नियंत्रक प्रमोद पाटील, कुलसचिव सुधीर राठोड, सहयोगी अधिष्ठाता डॉ.राजेंद्र गाडे, डॉ. राजेंद्र काटकर, डॉ. शैलेश हरणे, डॉ. प्रमोद वाकळे, डॉ. विलास अतकरे, नागपूर कृषी व्यवसाय व्यवस्थापन शाखेचे संचालक प्रा. डॉ. प्रकाश कडू, कुलसचिव डॉ. सतीश ठाकरे उपस्थिती होते. प्रास्ताविक विद्यापीठाचे कुलसचिव सुधीर राठोड यांनी केले. सूत्रसंचालन पीआरओ डॉ. किशोर बिडवे यांनी केले. डॉ. विलास खर्चे यांनी आभार मानले. वैयक्तिक पुरस्कार देऊनही गौरव वैयक्तिक पुरस्कारांमध्ये पशुसंवर्धन व दुग्ध शास्त्र विभागाचे प्रा. डॉ. राजेश्वर शेळके यांना उत्कृष्ट शिक्षक, कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. संजय काकडे यांना उत्कृष्ट कृषी संशोधक, कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा, जिल्हा वर्धाचे प्रमुख डॉ. जीवन कतोरे यांना उत्कृष्ट विस्तार संशोधक पुरस्कार व विभागीय फळ संशोधन केंद्र, काटोलचे डॉ. हितेंद्रसिंग गोरमनगर कृषी यांना उत्कृष्ट प्रक्षेत्र व्यवस्थापक तर मध्यवर्ती संशोधन केंद्र अकोला अंतर्गत वाशीम रोड फार्मचे शंकर देशमुख यांना उत्कृष्ट प्रक्षेत्र व्यस्थापन पुरस्कार देऊन गौरवले. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप होते. अकोला कृषी महाविद्यालयास सर्वोत्कृष्ट पुरस्कार यंदाच्या विद्यापीठ स्थापना दिनाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या सर्वोत्तम सेवांनी आणि परिश्रमाने विद्यापीठ पातळीवर सर्वोत्कृष्ट ठरलेल्या कृषी महाविद्यालय, कृषी तंत्र विद्यालय, कृषी विज्ञान केंद्र, कृषी संशोधन केंद्रासह उत्कृष्ट संशोधक, उत्कृष्ट विस्तार संशोधक, प्रक्षेत्र व्यवस्थापक यांना पुरस्कृत करण्यात आले. यामध्ये अकोल्याच्या कृषी महाविद्यालय सर्वोत्कृष्ट कृषी महाविद्यालयाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तर कृषी तंत्र विद्यालय, मुल मारोडा (जि. चंद्रपूर ) यांना उत्कृष्ट कृषी तंत्र विद्यालयाचा, विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांना उत्कृष्ट कृषी संशोधन प्रकल्प पुरस्कार तर कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा (जि. वर्धा) यांना उत्कृष्ट कृषी विज्ञान केंद्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

Share

-