खर्च सादर करण्यास अचलपुरातही 5 उमेदवाराची दांडी:एसडीओंनी बजावली नोटीस
अचलपुर विधानसभा मतदारसंघातील २२ पैकी ५ उमेदवारांनी खर्च सादर करण्यास दांडी मारली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा एसडीओ यांनी त्या उमेदवारांना नोटीस बजावून ४८ तासांच्या आंत खर्च सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. धामणगाव मतदारसंघातही याच कारणाहून पाच उमेदवारांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान पुढच्या टप्प्यात सर्व उमेदवारांनी ठरलेल्या वेळेवर निवडणूक खर्च सादर करावा, असे आवाहन निवडणूक निरीक्षकांसह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले आहे. या मतदारसंघाची पहिली खर्च तपासणी अलिकडेच पार पडली. यावेळी पाच उमेदवार अनुपस्थित होते. निरीक्षकांनी हा मुद्दा गंभीरतेने घेतला असून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार त्यांना नोटीस बजावून खुलासा मागवला आहे. अचलपुर मतदारसंघात खर्चावर देखरेखीसाठी उमा माहेश्वरी यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पहिली खर्च तपासणी अचलपुरच्या एसडीओ कार्यालयात पार पडली. यावेळी २२ पैकी १७ उमेदवारांनी खर्च सादर केला. अनुपस्थित पाच उमेदवारांना ४८ तासांच्या आत निवडणूक खर्चाचे लेखे सादर करण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे. दरम्यान विहीत मुदतीत खर्च सादर न केल्यास नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. उमेदवरांच्या लेख्याची दुसरी तपासणी ११ नोव्हेंबर, तर तिसरी तपासणी १५ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. दर्यापुरातही एकाला नोटीस दर्यापुर विधानसभा मतदार संघातही एका उमेदवाराने खर्च सादर केला नाही. त्यामुळे अनुपस्थित राहिलेल्या या उमेदवार महिलेला नोटीस बजावण्यात आली आहे. प्रकृती अस्वास्थामुळे आपण ठरलेल्या दिवशी उपस्थित राहू शकले नाही, असे या उमेदवार महिलेचे म्हणणे होते. त्यासाठीची आवश्यक वैद्यकीय दाखलेही त्यांनी पुरवले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांच्या निवडणूक खर्चाचे लेखे स्वीकारण्यात आले.