फडणवीस, शरद पवार, अजित पवार यांना अडकवण्याचा प्रयत्न:न्या. चांदीवाल यांचे गौप्यस्फोट; अनिल देशमुखांना देखील क्लीनचीट नाहीच

राज्यातील राजकारणात खळबळ उडवणाऱ्या शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात आता न्यायमूर्ती चांदीवाल यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपण अनिल देशमुख यांना क्लीनचीट दिली नसल्याचे म्हटले आहे. इतकच नाही तरी या प्रकरणातील पुरावे आयोगासमोर येऊ दिले नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर न्या. चांदीवाल यांनी प्रसार माध्यमाला दिलेल्या या मुलाखतीमुळे आता राज्यातील राजकारण पुन्हा एकदा चांगलेच ढवळून निघेल.

देशमुख आणि वाझे यांच्याकडून या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे देखील न्यायमूर्ती चांदीवाल यांनी केला आहे. शपथपत्रात वाझे यांनी अजित पवार आणि शरद पवारांची नावे घेतली. मात्र, नाव घेण्यामागचे कारण ओळखून ती नावे मी रेकॉर्डवर घेतली नसल्याचे चांदेवाल यांनी म्हटले आहे. तसेच आयोगाच्या अहवालात क्लीनचीट असा शब्दप्रयोगच नाही. उलटी योग्य साक्षी पुरावे मिळाले नाहीत, अशी टिप्पणी या अहवालात केली असल्याचे देखील न्या. चांदीवाल यांनी म्हटले आहे. राज्यात गाजलेल्या या 100 कोटी वसूलीच्या प्रकरणातील वाझे, परमबीर सिंग आणि देशमुख हे एकमेकांना भेटायचे. त्यानंतर वाझे यांनी साक्ष फिरवली. ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ असे सगळे सुरू होते. साक्ष पुराव्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही. सत्य बाहेर येऊ नये यासाठी प्रयत्न झाले असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. अहवालामधील बाबी कोणत्याच सरकारच्या पचणी पडणार नसल्याचा दावा देखील न्या. चांदीवाल यांनी केला आहे. प्रसिद्धी मिळवण्याचा वाझेंचा प्रयत्न

या प्रकरणात सचिन वाझे यांनी दोन राजकीय व्यक्तिमत्त्वांची नाव घेतली होती. यामध्ये अजित पवार आणि शरद पवार यांचा समावेश होता. मात्र ती नावे मी रेकॉर्डवर घेणार नाही, असे वाझेंना सांगितले. फडणवीस यांना गुंतवण्याचा देखील प्रयत्न वाझे आणि देशमुख यांनी केला. मात्र तेही मी रेकॉर्डवर घेतले नाही. त्यातून प्रसिद्धी मिळते, असे मला काहीही होऊ द्यायचे नव्हते. राजकीय व्यक्तींना गुंतववून स्वतः प्रसिद्धी मिळवण्याचा वाझेंचा प्रयत्न दिसत होता. मात्र मी तसे होऊ दिले नाही, असा दावा न्या. चांदीवाल यांनी केला आहे. पुरावे असून देखील दिले नाही सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांच्याकडे पुरावे होते. मात्र त्यांनी पुरावे असून देखील आपल्याला ते पुरावे दिले नसल्याचा उल्लेख आपण अहवालात केला आहे. अहवालात पुरावा नसल्याचे देखील न्या. चांदीवाल यांनी म्हटले आहे. अनिल देशमुख यांना क्लीनचीट आपण दिलेली नाही. असा शब्दच आपण अहवालात वापरलेला नाही. असे देखील त्यांनी स्पष्ट केले. अनिल देशमुख यांचा दावा फेटाळला या प्रकरणाची चौकशी करणारे न्यायमूर्ती चांदीवाल यांनी एबीपी माझा या वृत्त वाहिनीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये चांदीवाल यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. योग्य पुरावे आयोगासमोर येऊ दिले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे आयोगाने आपल्याला क्लीन चिट दिल्यामुळेच अहवाल सार्वजनिक होऊ दिला गेला नसल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला होता. मात्र अनिल देशमुख यांचा हा दावा न्यायमूर्ती चांदीवाल यांनी सपशेलपणे फेटाळला आहे.

Share