फारूखींची 20 वर्षांनी काँग्रेसमध्ये वापसी:कमाल फरूखी व उमर फारूखींचा समर्थकांसह काँग्रेमध्ये प्रवेश

ज्येष्ठ नेते कमाल फारूखी व त्यांचे पुत्र बॅरिस्टर उमर फारूखींनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडत काँग्रेसचा हात धरला आहे. मुंबईतील टिळक भवनमध्ये दोघा पिता-पुत्रांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. फारूखी हे छत्रपती संभाजीनगरमधील काँग्रेसचे जुने नेते असून 2004 मध्ये त्यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली होती. आता 20 वर्षांनी पुन्हा त्यांची पक्षात वापसी झाली आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या वेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाणांसह काँग्रेसचे इतर नेते व मान्यवरांची उपस्थिती होती. उमर फारूखी यावेळी म्हणाले की, “मी राहुल गांधीजी आणि मल्लिकार्जुन खरगेजी यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये सामील होऊन गौरवान्वित अनुभव करत आहे. काँग्रेस पक्ष आपली घटनात्मक मूल्ये आणि न्याय, समानता, आणि एकतेचा आवाज म्हणून खऱ्या अर्थाने उभा आहे. आम्ही मिळून एक चांगला आणि सर्वसमावेशक भारत घडवण्यासाठी काम करू.” यावेळी कमाल फारूखी शरद पवार यांच्याबद्दल म्हणाले की, “मला पवार साहेबांबद्दल खूप आदर आणि
सन्मान आहे आणि मी पक्षासोबतच्या 19 वर्षांबद्दल आभारी आहे. आता बहिणीच्या पक्षात परतण्याची
वेळ आहे, आणि दोन्ही पक्षांच्या सामान्य विचारधारांना मी अजूनही बांधील आहे.” फारूखींनी 2004 मध्ये काँग्रेस सोडली होती. त्यांनी 1978 मध्ये काँग्रेसची विद्यार्थी संघटना NSUI आणि नंतर युवक कााँग्रेसच्या माध्यमातून राजकीय कारर्कदीची सुरुवात केली होती. 2004 मध्ये पक्षासोबत मतभेदांनंतर त्यांनी बंड करून बसपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. तर त्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Share

-