पहिल्यांदा शेतकऱ्यांचे पैसे द्या, मग मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा करा:नेतृत्व विकास करणारे लागते, अजित पवारांचा जयंत पटलांवर हल्लाबोल

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व उमेदवार जयंत पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पहिल्यांदा लोकांच्या समस्येवर, शेतकऱ्यांना पैसा द्या, मग मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा मारा, अशा शब्दात जयंत पाटील यांच्यावर अजित पवारांनी टीका केली आहे. मग मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा मारा
अजित पवार म्हणाले, पहिल्यांदा शेतकऱ्यांना पैसा द्या, मग मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा मारा. कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे पैसे हाणले, दुसऱ्या ठिकाणी काढलेले कारखाने हाणण्याचे काम जयंत पाटील करतात. लोकांना पिण्याचे पाणी देत नाहीत, त्यांच्या अंगातच पाणी नाही तर लोकांना कुठून देणार? लोकांचे प्रश्न सोडवायचे असेल तर धमक आणि ताकद लागते. 35 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात. परंतु, साधी एमआयडीसी उभारण्याचे काम झाले नाही. नेतृत्व विकास करणारे लागते, नुसते काय सांगता, काय बोलता, असे बोलून होत नाही. अरे काय सांगता, काय सांगता. मी जे सांगतो तुमच्या डोक्यात घुसत नाही मग काय सांगू? तुमचे सरकार होते तेव्हा झोपा काढत होता का?
महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीवर टीका करताना अजित पवार म्हणाले, 25 लाख रुपये प्रत्येक कुटुंबाला विम्याचा संरक्षण यांच्या बापाने दिले होते का? आम्ही दीड हजार दिल्यावर ते 3 हजार द्यायला निघाले मग तुमचे सरकार होते तेव्हा झोपा काढत होता का? देशाचे विरोधी पक्षनेते खटाखट पैसे देतो असे सांगतात, देशाचे विरोधी पक्ष नेते उल्लू बनवत आहेत, पण आम्ही काही गोट्या खेळत नाही. गेल्या अनेक वर्षापासून जे नेते सांगत आहेत घड्याळाचे बटन दाबा, मी देखील तेच सांगतोय, मी काही वेगळे सांगत नाही. गलिच्छ राजकारण इस्लामपूरमधील नेतृत्वाने केले
अजित पवार म्हणाले, मी मुस्लिम समाजाला देखील बरोबर घेऊन जात काम करतो. मुस्लिम समाज देखील महत्त्वाचा आहे, त्या समाजाला देखील संधी मिळाली पाहिजे, म्हणून मी इद्रिस नायकवडी यांना विधान परिषदेवर आमदार केले. अगदी गलिच्छ राजकारण इस्लामपूरमधील नेतृत्वाने केले आहे. निवडणुकीपुरते आमचे राजकारण असते, निवडून आल्यावर आम्ही राज्याची कामे करण्यासाठी बसतो. लोकांनी विश्वास ठेवायचा कोणावर?
जयंत पाटलांच्या गावातील पोलिस स्टेशन आज देखील भाड्याच्या जागेत आहे. जयंत पाटलांना त्यांच्या गावातील पोलिस स्टेशन बांधता येत नाही आणि हे निघाले राज्याचे नेतृत्व करायला. उमेदवारांना उभ करायचे आणि तिथे मॅच फिक्सिंग करून मिली भगत करून उमेदवार पाडायचे हे राजकारण जयंत पाटलांचे आहे. नेताच काट्याने काटा काढायला लागला तर लोकांनी विश्वास ठेवायचा कोणावर? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे.

Share