बाबा सिद्दिकी हत्याकांड:चौथ्या आरोपीला उत्तर प्रदेशातील बहराईच येथून केली अटक

माजी राज्यमंत्री आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने मंगळवारी चौथ्या आरोपीला उत्तर प्रदेशातील बहराईच येथून अटक केली. हरीशकुमार बालकराम (२३) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो पुण्यात भंगार डीलर म्हणून करत होता, मात्र सिद्दिकींच्या हत्येची घटना घडल्यापासून तो फरार होता. पोलिसांनी लागोपाठ अटकसत्र चालवले असले तरी सिद्दिकी यांना कोणत्या कारणासाठी मारण्यात आले, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. हरीशकुमारला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला मंगळवारी मुंबई न्यायालयात हजर केले. त्याला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हरीशकुमारने सिद्दिकी यांची हत्या करणाऱ्यांना पैसे देऊन मदत केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. मारेकऱ्यांनी जुहू चौपाटीवर काढलेल्या फोटोमुळे सुगावा लागणे झाले सोपे सिद्दिकी यांच्या हत्येत सहभागी असलेल्या तिघांनी जुहू बीचवर एक फोटो काढला. मारेकरी कश्यपच्या मोबाइलमध्ये हा फोटो काढण्यात आला. तो पोलिसांच्या तपासात अत्यंत महत्वाचा ठरला. त्यातूनच पोलिसांना तिसऱ्या फरार आरोपीची ओळख पटली आणि ते तिघे या कटात एकत्र होते याचाही छडा लागला. पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी धर्मराज कश्यप (१९) व गौतम (२४) दोघे उत्तर प्रदेशच्या बहराइचचे रहिवासी आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे दोघे पुण्याहून मुंबईत दाखल झाले. काही दिवसांत तिसरा आरोपी गुरमेल सिंगही (२३) हरियाणाच्या कैथलमधून मुंबईत दाखल झाला. दरम्यान, पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी सिद्दिकींना गोळ्या झाडल्या ती पिस्तुलं कुर्ला पश्चिममध्ये ते राहात असलेल्या खोलीवर कुरिअरने आल्याचं समोर आले आहे. या महिन्याभरात आरोपींनी त्यांच्या खोलीपासून सिद्दिकींच्या कार्यालयापर्यंत व घरापर्यंत ऑटोने प्रवास करून त्या भागाची अनेकदा रेकी केल्याचं समोर आलं आहे. सिद्दिकी कोण हे आरोपींना समजण्यासाठी त्यांच्या एका बॅनरचा फोटो आरोपींना देण्यात आला होता. रेकी करण्याबरोबरच हे आरोपी इतरही काही ठिकाणी गेले. जुहू चौपाटीवर जेव्हा ते गेले, तेव्हा त्यांनी मोबाइलमध्ये फोटोही काढला, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानने दिली. घटनास्थळापासून १०० मीटरवर पडून होती एक काळी पिशवी १२ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी रात्री ९.३० च्या सुमारास सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या झाली होती. हे घटनास्थळ सिद्दिकी यांचे आमदार पुत्र झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाजवळ आहे. घटनास्थळापासून १०० मीटर अंतरावर चार दिवसांपासून एक काळी पिशवी त्याच ठिकाणी पडून असल्याची माहिती मंगळवारी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी ती बॅग जप्त करून तिची झडती घेतली असता, त्यातून एक पिस्तूल आणि काही महत्त्वाची कागदपत्रे सापडली. या पिस्तुलातून गोळीबार झाल्याचा संशय आहे.

Share

-