गणेश आचार्य यांचा विद्यार्थ्यांशी संवाद:म्हणाले – प्रतिभावंतांना कलाक्षेत्रात जागतिक व्यासपीठावर स्वतःला सिद्ध करण्याची संधी
महाराष्ट्रातील तरुणांना बॉलिवूडमध्ये संधी मिळायला हवी. ‘पिंटू की पप्पी’मध्ये सुशांत थमके या मराठी मुलाला ब्रेक दिला आहे. त्याच्यामध्ये खूप प्रतिभा आहे. संघर्षातून पुढे आलेला हा तरुण आहे. मराठी तरुणांकडे गुणवत्ता असते. त्यांना योग्य संधी आणि व्यासपीठ मिळाले, तर ते स्वतःला सिद्ध करतात. अशा संधींचा लाभ घेत मराठी कलाकारांनी चित्रपटसृष्टीत भरीव योगदान द्यावेअसे मत प्रख्यात कोरिओग्राफर व अभिनेता-दिग्दर्शक गणेश आचार्य यांनी व्यक्त केले. सूर्यदत्त इन्स्टिटयूट ऑफ परफॉर्मिंग आर्टस् च्या वतीने गणेश आचार्य यांच्याशी विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी ‘सूर्यदत्त’चे संस्थापक व अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेश आचार्य यांना ‘सूर्यदत्त एक्सलन्स अवॉर्ड’ने गौरविण्यात आले, तर अभिनेता सुशांत थमके, अभिनेत्री जाण्या जोशी, विधी यादव यांचा विशेष सन्मान करण्यात आला. गणेश आचार्य म्हणाले,दिल्ली, भोपाळ, पंजाब आदी शहरांतून मुले येऊन बॉलिवूडमध्ये नाव कमावतात. महाराष्ट्रातील मुलांना ही संधी का मिळत नाही, याची सल मला अनेक वर्षांपासून होती. त्यामुळे सुशांतला घेऊन हा चित्रपट केला आहे. दोघेही नवखे कलाकार आहेत. पण दोघांनीही सुरेख काम केले आहे. हा मुलगा येत्या काळात बॉलिवूड गाजवेल. पदार्पण करणाऱ्या अभिनेत्याचा हा पहिलाच सिनेमा आहे. सुशांत थमके म्हणाला,पुण्यामध्येच माझे महाविद्यालयीन शिक्षण झाले आहे. माझ्या पहिल्या चित्रपटाचे प्रमोशन पुण्यातील महाविद्यालयांत होतेय, याचा आनंद आहे. नांदेड ते पुणे आणि आता मुंबईचा प्रवास सुखावणारा आहे. सुरुवातीला अनेक वर्षे संघर्ष करावा लागला. मात्र, गणेश आचार्य यांच्यामुळे ही सुवर्णसंधी मिळाली आहे. प्रेक्षकांच्या मनाला भावेल, असा हा चित्रपट असणार आहे. आपल्या सर्वांचे प्रेम आणि शुभेच्छा मिळाव्यात. प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले,चित्रपटसृष्टीचे संबंधित अनेक अभ्यासक्रम ‘सूर्यदत्त’मध्ये आहेत. त्यामुळे मराठी, हिंदी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कलाकारांची टीम सूर्यदत्तमध्ये येते. विद्यार्थ्यांशी संवाद साधते. त्यातून आमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळते. यातील अनेक विद्यार्थी चित्रपटसृष्टीमध्ये जातात. त्यांच्यातील प्रतिभा, कला ओळखून त्यांना चांगले व्यासपीठ दिले, तर तेही या क्षेत्रात नाव कमावतात. गणेश आचार्य यांचे योगदान अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. कला क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांच्याप्रमाणे मराठी तरुण तरुणींना सामावून घ्यावे, त्यांना पाठबळ द्यावे.