गुईलेन बॅरी सिंड्रोमबाबत दिलासादायक बातमी:ससून रुग्णालयातील 5 रुग्णांची GBS वर यशस्वी मात, डॉक्टरांकडून पुष्पगुच्छ देत डिस्चार्ज

पुण्यातून गुईलेन बॅरी सिंड्रोमबाबत एक दिलासादायक बाब समोर आली आहे. ससूनमधील 5 जीबीएसबाधित रुग्णांनी आजारावर यशस्वी मात केली. डॉक्टरांनी या रुग्णांना फुलांचा पुष्पगुच्छ देत, पेढे भरवत एकत्रित डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी या रुग्णांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पाहायला मिळाले. पुण्यात आतापर्यंत 149 जीबीएस बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन संशयित रुग्णांचा मृत्यू देखील झाला. यामुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आज डिस्चार्ज मिळालेल्या पाच रुग्णांना ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.एकनाथ पवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देण्यात आले. यावेळी अधीक्षक डॉ.यलप्पा जाधव, डॉ.रोहिदास बोरसे, डॉ. एच.बी.प्रसाद हे उपस्थित होते. ससूनमध्ये उपचार घेणाऱ्या GBS रुग्णांना मोफत उपचार देण्यात येत आहे. यावेळी रुग्ण तसेच रुग्णाच्या नातेवाईकांच्या चेहेऱ्यावर स्मितहास्य पाहायला मिळाले. आणखी 10 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येणार ससून रुग्णालयाचे डॉक्टर म्हणाले, आपल्याकडे सध्या 28 रुग्ण आहेत. गेल्या पंधरा दिवसापासून जीबीएस आजाराचे रुग्ण पुण्यामध्ये जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. 100 पेक्षा जास्त रुग्ण सध्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये या आजाराबाबत काही प्रमाणात भीती निर्माण झाली आहे. परंतु आनंदाची बातमी ही आहे की, आपल्याकडचे पाच रुग्ण व्यवस्थित रित्या बरे होऊन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येत आहे आणि येत्या दोन-तीन दिवसात आणखी दहा रुग्ण बरे होत आलेले आहेत त्यांना देखील डिस्चार्ज देण्यात येईल. नागरिकांनी भीती वाटून घेऊ नये, या आजाराची काही लक्षणे आहेत. लवकर उपचार चालू केले तर शंभर टक्के रुग्ण हा बरा होतो. परंतु आठ दहा दिवसानंतर तुम्ही उपचार सुरू केले तर थोडेसे क्रिटिकल कंडिशन होते. त्यामुळे रुग्णांनी घाबरून न जाता लवकरात लवकर उपचार सुरू करावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले. पिंपरी-चिंचवडमध्ये जीबीएसमुळे पहिला मृत्यू
दरम्यान, शुक्रवारी पिंपरी-चिंचवडमध्ये जीबीएसमुळे एका 36 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला होता. पिंपरी-चिंचवडमधील जीबीएसमुळे झालेला हा पहिला मृत्यू होता. तो पिंपळे गुरव येथील रहिवासी होता. रुग्णालयात दाखल केल्यापासूनच तो व्हेंटिलेटरवर होता. जीबीएसमुळे मृत्यु झालेला रुग्ण ओला-उबेर चालक होता. टॅक्सी चालक असल्याने कोणत्या परिसरातील पाणी प्यायल्याने जीबीएसची लागण झाली, हे कळू शकले नाही. पिंपरीतील सहा वर्षांची मुलाची जीबीएसवर यशस्वी मात
या आजाराची लागण एका सहा वर्षांच्या मुलाला झाली होती. त्यानंतर त्याला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काही दिवसांच्या उपचारानंतर या मुलाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. सुरुवातीला त्याचे पाय दुखत होते. त्यानंतर आम्ही त्याला आमच्या डॅाक्टरांकडे नेले. हा त्रास आणखीनच वाढत गेला. त्यानंतर डॅाक्टरांनी रक्त तपासणी करण्यास सांगितली. त्या तपासाणीच्या अहवालात त्याला जीबीएसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तातडीने त्याला आम्ही रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आता तो बरा असल्याचे या मुलाच्या आईने सांगितले.

Share