त्यांना कधी आनंद दिघेंसोबत पाहिले नाही:वारसदार म्हणून मीच अग्नी दिला होता, मुख्यमंत्र्यांच्या टीकेला केदार दिघेंचे प्रत्युत्तर
मी केदार दिघे यांना आनंद दिघे यांच्यासोबत कधीही पहिले नाही, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार व आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टीकेवर केदार दिघे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दिघेंच्या पार्थिवाला मीच वारसदार म्हणून अग्नी दिला आहे, असे केदार दिघे म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना केदार दिघे यांच्यावर टीका केली होती. त्याचा स्क्रीनशॉट एक्सवर शेअर करत केदार दिघे यांनी शिंदेंना प्रत्युत्तर दिले आहे. केदार दिघे म्हणाले, दिघे साहेबांच्या पवित्र पार्थिवाला मी वारसदार म्हणून अग्नी दिला आहे. मी माझ्या लहान वयात दिघी साहेबांसोबत वावरलो आहे. ते वय काय राजकारण करण्याचे नव्हते इतके मुख्यमंत्री असणाऱ्या माणसाला कळू नये, असे म्हणत केदार दिघे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काय म्हणाले होते मुख्यमंत्री शिंदे?
एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला होता की पाचपाखडी विधानसभा मतदारसंघात कोणत्याही मोठ्या नेत्याची प्रचार सभा झाली नाही. परंतु या मतदारसंघात दिघे हे आडनाव असलेला उमेदवार तुमच्या विरोधात उभा आहे, याबद्दल काय वाटते? त्यावर शिंदे म्हणाले, आनंद दिघे आणि केदार दिघे यांच्यात खूप सारे अंतर आहे. आनंद दिघे हे माझे गुरु आहेत. त्यांचाच आदर्श घेऊन मी राजकारणात पुढे चाललो आहे. मला केदार दिघे हे आनंद दिघे यांच्यासोबत कधीही दिसले नाहीत. आडनावाने काहीही फरक पडत नाही, असे म्हणत केदार दिघे यांना टोला लगावला होता. दरम्यान, पाचपाखडी विधानसभा मतदारसंघात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवडणूक लढवत आहेत, तर त्यांच्या विरोधात आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे पाचपाखडी मतदारसंघातील ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच पुन्हा निवडून येणार की दिघे आडनावाचा फायदा केदार दिघे यांना होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.