हमासचा युद्धबंदी करार; इस्रायलने कैदी सोडावेत,मग ओलिसांची सुटका करणार:इस्रायल-हिज्बुल्लाह संघटनेसोबतच्या युद्धबंदीनंतर हमासचे सूर नरमले
७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण पश्चिम आशियात अराजकता पसरवल्यानंतर सुमारे १४ महिन्यानंतर (४१८ दिवस) हमासने हिज्बुल्लाह प्रमाणेच आपणही युद्धबंदी करण्यास तयार असल्याचे जाहीर केले. अमेरिका-फ्रान्सच्या मध्यस्थीनंतर लेबनॉन व इस्रायल सरकार बुधवारी युद्धबंदी तयार झाले. सुमारे ७० दिवसांपूर्वी सप्टेंबरमध्ये पेजर व वॉकीटॉकीमधील स्फोटानंतर इस्रायल सैन्याने लेेबनॉनमध्ये हिज्बुल्लाहच्या तळांवर हल्ले केले होते. इस्रायली हल्ल्यांत हिज्बुल्लाहचा कमांडर हसन नसरुल्ला व ३,८२३ लेबनानी नागरिकांचा मृत्यू झाला तर १५,८५९ लोक जखमी झाले. हमासने युद्धबंदीसाठी तयारी दर्शवली आहे. हमासचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, आम्ही इजिप्त, कतार, व तुर्कीयेच्या मध्यस्थीसाठी तयारी दाखवली आहे. त्यानुसार हमास युद्धबंदी करार व कैद्यांच्या सुटका करण्यासाठी गंभीर अशा करारास तयार आहे. हमासला १०० इस्रायली ओलिसांच्या बदल्यात १ हजार लढवय्यांची सुटका हवी हमास -इस्रायलदरम्यान युद्धबंदीच्या अटींबाबत सूत्र म्हणाले, हमास सुमारे १०० ओलिसांच्या बदल्यात एक हजार पॅलेस्टाईन व हमास लढवय्यांची सुटका व्हावी यासाठी दबाव आणत आहे. ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर हमासच्या लढवय्यांनी २५४ जणांना ओलिस ठेवले होते. पहिल्या टप्प्यातील चर्चेनंतर इस्रायलने १५४ कैद्यांची सुटका केली.परंतु अजूनही १०१ ओलिस हमासच्या ताब्यात आहेत. इस्रायलमध्ये सुटका झालेल्यांच्या नातेवाईकांमध्ये आनंद पसरला. परंतु कट्टरवादी राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इतामार बेन गवीर यांनी मात्र असा कोणताही करार होऊ दिला जाणार नसल्याची धमकी दिली आहे. ओलिसांच्या बदल्यात कैद्यांची सामुहिक सुटका होणार नाही. इस्रायली हल्ल्यांत बैरूत उद्ध्वस्त, तरीही घरी परतल्याचा आनंद.. इस्रायल-हिज्बुल्लाहच्या युद्धबंदीत अनेक अटी आहेत. त्यानुसार दोन्ही बाजूने शत्रुत्व रोखण्यासाठी ६० दिवसीय युद्धबंदी लागू असेल. हिज्बुल्लाह संघटनेला आपल्या लढवय्यांना इस्रायल-लेबनॉन सीमा (ब्लू लाइन) यापासून ४० किमी मागे हटवावे लागेल. इस्रायलचे सैनिक लेबनॉन क्षेत्रातून बाजूला होतील. संयुक्त राष्ट्राचे शांती सैन्य दक्षिण लेबनॉनमध्ये हिज्बुल्लाहची जागा घेईल. या कराराचे पालन अमेरिकन नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय समिती करेल.