इस्रायली हल्ल्यात हमास चीफ याह्या सिनवार मारला गेला होता का?:अनेक दिवसांपासून बेपत्ता; बोगदा हल्ल्यात मृत्यू झाल्याचा इस्रायली लष्कराला संशय, तपास सुरू

इस्रायलच्या मिलिटरी इंटेलिजन्सने हमासचा नेता याह्या सिनवारचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, सिनवार काही काळापासून बेपत्ता होता. त्याचा कोणाशीही संपर्क झालेला नाही. अशा स्थितीत गाझावरील हल्ल्यात सिनवार मारला गेल्याची शक्यता इस्रायली लष्कर तपासत आहे. सिनवारच्या मृत्यूबाबत अद्याप कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. तथापि, अनेक मोठ्या इस्रायली मीडिया हाऊसच्या वृत्तांतून हमासच्या नेत्याच्या मृत्यूचा अंदाज लावला जात आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सने (आयडीएफ) दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी काही दिवसांपूर्वी गाझामधील एका शाळेवर हल्ला केला होता. हमासचे कमांड सेंटर येथे होते. या हल्ल्यात 22 जणांचा मृत्यू झाला होता. अशा परिस्थितीत या हवाई हल्ल्यात सिनवारचाही मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सिनवारच्या मृत्यूचा पुरावा नाही इस्रायली मीडिया हारेट्झच्या म्हणण्यानुसार, इस्रायलने अलीकडेच गाझामधील बोगद्यांवर हल्ला केला आहे जिथे सिनवार लपला असल्याचे मानले जात होते. मात्र, आतापर्यंत या हल्ल्यात सिनवारच्या मृत्यूशी संबंधित कोणताही सुगावा लागलेला नाही. सिनवार अचानक गायब होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकवेळा सिनवार काही काळ गायब झाल्यानंतर युद्धविराम करार किंवा अन्य काही संदेश घेऊन परतला आहे. दुसरीकडे, इस्रायलची अंतर्गत सुरक्षा एजन्सी शिन बेटने सिनवारच्या मृत्यूबाबतच्या अटकळी फेटाळून लावल्या आहेत. हमासच्या सर्वोच्च नेतृत्वात फक्त सिनवार राहिला आहे गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यात तीन महत्त्वाचे सूत्रधार होते. यामध्ये राजनैतिक प्रमुख इस्माइल हनियेह, लष्करी प्रमुख मोहम्मद दाईफ याशिवाय गाझामधील हमास नेता याह्या सिनवार यांचा समावेश होता. 31 जुलै रोजी इराणमधील हनियेहच्या मृत्यूनंतर, सिनवार हा संस्थेचा नवीन प्रमुख बनला. दरम्यान, 13 जुलै रोजी झालेल्या हवाई हल्ल्यात हमासचा लष्करी प्रमुख मोहम्मद दाईफ मारला गेला, याची पुष्टी 1 ऑगस्टला झाली. अशा परिस्थितीत हमासच्या सर्वोच्च नेतृत्वात आता फक्त सिनवार उरला आहे. त्यामुळे यावेळी इस्रायलचे संपूर्ण लक्ष सिनवारला शोधून त्याला मारण्यावर आहे. गाझा छावणीतून बाहेर आल्यानंतर याह्या सिनवार हमासचा नेता झाला याह्या सिनवार हा गाझामधील हमासचा नेता आहे. तो इस्रायलमधील मोस्ट वॉन्टेड लोकांपैकी एक आहे. 61 वर्षीय याह्या सिनवारला लोक अबू इब्राहिम या नावानेही ओळखतात. त्याचा जन्म गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील खान युनिस निर्वासित छावणीत झाला. याह्याचे आई-वडील अश्केलॉनचे होते, परंतु, जेव्हा 1948 मध्ये इस्रायलची स्थापना झाली आणि हजारो पॅलेस्टिनींना त्यांच्या वडिलोपार्जित घरातून बाहेर काढण्यात आले तेव्हा याह्याचे पालकही निर्वासित झाले. पॅलेस्टिनी लोक याला ‘अल-नकबा’ म्हणजेच विनाशाचा दिवस म्हणतात. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, याह्या सिनवारला सर्वप्रथम इस्रायलने 1982 मध्ये अटक केली होती. त्यावेळी त्याचे वय 19 वर्षे होते. याह्यावर ‘इस्लामी कारवायांमध्ये’ सहभागी असल्याचा आरोप होता. 1985 मध्ये त्याला पुन्हा अटक करण्यात आली. याच सुमारास याह्याने हमास संस्थापक शेख अहमद यासिन विश्वास जिंकला. 1987 मध्ये हमासची स्थापना झाल्यानंतर दोन वर्षांनी याह्याने आपली कुख्यात अंतर्गत सुरक्षा संघटना अल-मजदची स्थापना केली. तेव्हा सिनवार 25 वर्षांचा होता.

Share