हर्षवर्धन देशमुख निवडणूक लढवणार नाहीत:म्हणाले, पक्ष ज्याला तिकीट देईल, त्याचा प्रचार करणार

राज्याचे माजी कृषी मंत्री तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी विधानसभा निवडणूक लढण्यापासून स्वत:ला दूर ठेवण्याचे ठरविले असून पक्ष देईल त्या उमेदवाराचा प्रचार करण्याचे मान्य केले आहे. हर्षवर्धन देशमुख हे शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून यापूर्वी विधानसभेत त्यांनी मोर्शी-वरुड मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. शरद पवार यांनी दिलेल्या निधीतून श्री शिवाजी शिक्षण संस्था एका यशस्वी शेतकरी महिलेला पुरस्कार देणार आहे. त्यानिमित्त माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील राजकीय भाष्य केले. ते म्हणाले, संस्थेचा व्याप मोठा असल्याने मी स्वत: निवडणूक लढणार नाही. परंतु पक्ष ज्या उमेदवाराला तिकीट देईल, त्याचा प्रचार करेन. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या गेल्या निवडणुकीत माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे आणि त्यांच्यात सामना रंगला होता. त्यामुळे या दोघांमध्ये राजकीय वैमनस्य असल्याचे सार्वमत बनले होते. सध्या नरेशचंद्र ठाकरे यांचे चिरंजीव आणि वरुड पंचायत समितीचे माजी सभापती यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे हर्षवर्धन देशमुख काय भूमिका घेतील, याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवरच वरील प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. परंतु त्यांनी स्वत:च ही बाब खोडून काढीत पक्षाने कुणालाही तिकीट दिली, तरी मी त्या उमेदवाराचा प्रचार करेन, हे मान्य केले. महाविकास आघाडीमध्ये या मतदारसंघावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दावा केला आहे, तर तिकडे महायुतीमधील अजीत पवार गटाचे देवेंद्र भुयार हे सध्या मोर्शी-वरुडचे आमदार आहेत.

Share

-