ही शिंदे-फडणवीसांची मैना, केली महाराष्ट्राची दैना!:कॉंग्रेसकडून महायुतीवर जोरदार हल्लाबोल हल्लाबोल

आगामी विधानसभा निवडणुका आता तोंडावर येऊन ठेपली आहे. अशात सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी देखील सुरू आहे. महाराष्ट्रभर राजकीय नेत्यांचे दौरे सुरू आहेत. या सगळ्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप देखील जोरदार सुरू आहेत. ही शिंदे-फडणवीसांची मैना, केली महाराष्ट्राची दैना, असे म्हणत कॉंग्रेसने महायुतीवर चांगलाच हल्लाबोल चढवला आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या घरासमोर एक रथ उभा करण्यात आला आहे. या रथावर ‘ही शिंदे फडणवीसांची मैना, केली महाराष्ट्राची दैना’, असा मथळा छापण्यात आला आहे. तसेच भ्रष्टमुक्ती टेम्पो सर्विस, उद्योग गुजरातला घेऊन जाणार, असे देखील फलक या रथावर लावण्यात आले आहे. हा रथ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. याचसोबत कॉंग्रेसचे संभाव्य उमेदवार प्रफुल गुडधे यांच्याही फलकांची जोरदार चर्चा सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला या पार्श्वभूमीवर ‘महाराज आम्हाला माफ करा’ आणि ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे गुडधे यांचे फलकही सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या फलकामार्फत प्रफुल गुडधे कोणावरही थेट टीका जरी करत नसले तरी त्यांचा संदेश मात्र सर्वांपर्यंत पोहोचत आहे. त्यातच आता या रथाची भर पडली आहे. त्यामुळे कॉंग्रेसने महायुतीवर चांगलाच हल्लाबोल चढवला असल्याचे दिसत आहे. कॉंग्रेसच्या या रथाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील उद्योग कसे गुजरातला पळवले जातात याची माहिती दिली जात आहे. महायुतीसरकारने राज्यातील उद्योग पळवण्यासाठी टेम्पो सर्विस सुरू केली असल्याचे या माध्यमातून सांगितले जात आहे. तर दुसरीकडे महायुती सरकारकडून राज्यात करण्यात आलेल्या कामाची सभा घेत माहिती दिली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात दोन नव्या प्रकल्पांचे भूमिपूजन केले. या प्रकल्पामधून किती रिजगार निर्मिती होणार आहे याची देखील माहिती देण्यात आली. तसेच नागपूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाचे देखील लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

Share

-