कल्याणमध्ये भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला दगडाने ठेचण्याचा प्रयत्न:राजकीय हेतूने हल्ला असल्याचा हेमंत परांजपे यांचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ

कल्याण येथे भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते हेमंत परांजपे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना शनिवारी रात्री 10 च्या सुमारास घडली असल्याचे समजते. हेमंत परांजपे पारनाका परिसरातून जात असताना एका दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर हल्ला केला. परांजपे यांना लाथा बुक्क्यासह मोठ्या दगडांनी बेदम मारहाण केली आहे. हेमंत परांजपे यांच्यावर मोठे दगड टाकत मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झाली आहे. दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न हल्लेखोरांचा असल्याचे यातून दिसत आहे. या प्रकरणी आता आरोपींचा तपास सुरू आहे. तसेच जखमी झालेल्या हेमंत परांजपे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमी झालेल्या हेमंत परांजपे यांना कल्याण पश्चिम येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तसेच हा हल्ला नेमका कोणी केला आणि कुठल्या हेतूने केला ही अद्याप कळू शकले नाही. मात्र, या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना हेमंत परांजपे म्हणाले, हा हल्ला राजकीय हेतूने करण्यात आला आहे. कल्याणमध्ये मी सीनियर नेता आहे. उपाध्यक्ष पदावर आहे मी. त्यामुळे हा हल्ला राजकीयप्रेरित असल्याचा दावा परांजपे यांनी केला आहे. दरम्यान, कल्याणमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारीच्या तसेच मारहाणीच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्यामुळे येथील पोलिस प्रशासन झोपा काढत आहे का, असा सवाल उपस्थित झाला आहे. कल्याणमध्ये दोन मराठी कुटुंबावर परप्रांतीयांनी हल्ला केला होता. पहिल्या घटनेत आरोपी अखिलेश शुक्ला होते तर रविवारी उघडकीस आलेल्या घटनेत एका पोलिस तरुणाला व त्याच्या पत्नीला पांडे नामक व्यक्तीने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

Share