उच्च शिक्षीत आदिवासी तरूण ऊसतोडणीच्या कामावर:विशेष पदभरती घेण्यासाठी हिंगोलीत आंदोलन, शेकडो बेरोजगारांचा सहभाग

राज्यात आदिवासी बांधवांसाठी विशेष पदभरती घेतली जात नसल्याने पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी सध्या ऊसतोडीच्या कामावर जात असून हा समाजावर झालेला अन्याय आहे. शासनाने तातडीने विशेष पदभरती घ्यावी या मागणीसाठी आदिवासी युवक कल्याण संघाच्या वतीने शुक्रवारी ता. २८ हिंगोलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. येथील जिल्हाधिकारी कार्यालसमोर आंदोलनात माजी आमदार डॉ. संतोष टारफे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीष पाचपुते, संजय भुरके, संजय काळे, बबन डुकरे, कृष्णा पिंपरे, मारोती बेले, शंकर शेळके यांच्यासह बेरोजगार युवक व युवती सहभागी झाले होते. राज्यात विविध विभागांमधून अनुसुचीत जमाती संवर्गातील सुमारे ५० हजार पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. काही बिगर आदिवासींनी बनावट प्रमाणापत्र काढून आदिवासी बांधवांची पदे बळकावळी आहे. सदर प्रकार आदिवासी बांधवांवर अन्याय करणारा आहे. विशेष म्हणजे पद भरती नसल्यामुळे राज्यात हजारो पदवी व पदव्युत्तर झालेले बेरोजगार युवक व युवती ऊसतोडीच्या कामावर जात आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पदभरती करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या शिवाय बिंदू नामावलीत अनुसुचीत जमातीवर होणारा अन्याय दूर करावा, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत पोलिस भरती, बँकींग, राज्य लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग या शैक्षणिक प्रशिक्षण दिले जाते. मात्र याचा कालावधी सहा महिन्यावरून दिड वर्ष करावा, शासकिय आदिवासी वसतीगृहात पुर्वी प्रमाणेच भोजनाची व्यवस्था करावी यासर इतर मागण्यांबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे सादर केले आहे. राज्य शासनाने या मागण्यांबाबत तातडीने विचार करून विशेष पदभरती घ्यावी अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

Share