इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत धमकी प्रकरण:प्रशांत कोरटकरच्या प्रत्यक्ष हजेरीबाबत आज सत्र न्यायालयात सुनावणी

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करून इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोन करून धमकी दिल्याप्रकरणी फरार असलेल्या प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनावर मंगळवारी कोल्हापुरातील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. कोरटकरला प्रत्यक्ष हजर ठेवावे की नाही यावर आज सुनावणी होणार आहे. कोरटकर जामीन प्रकरणी नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार झालेल्या सुनावणीत मंगळवारी ॲड. बाबा इंदुलकर यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबाबत अवमानकारक वक्तव्यांविषयी तातडीने कारवाई व्हावी. कोरटकरने पत्नीच्या मोबाईलमधील सर्व डेटा डिलीट करून स्वतःचा मोबाईल पोलिसांच्या हवाली केला, असा दावा सावंतांचे वकील ॲड. असीम सरोदेंनी केला आहे. कोरटकरच्या वकिलांनी तो खोडून काढला आहे. कोरटकरला तात्काळ अटक करा- सरोदे दरम्यान वकील असीम सरोदे म्हणाले की, प्रशांत कोरटकर हा विषारी माणूस आहे त्याला तात्काळ अटक करण्यात आली पाहिजे. मी जेवढे त्याला ओळखतो तितका सावंत यांना धमकी देणारा आवाज त्याचाच आहे. मोबाइल देताना त्यामधील डाटा डिलीट करण्यात आला आहे. हे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. असीम सरोदे म्हणाले की, प्रशांत कोरटकर नावाच्या तथाकथित पत्रकाराने भ्रष्ट मार्गाने बऱ्याच गोष्टी केल्या आहेत, हे पुढे आले आहे. तो ज्या विचारधारेशी निगडीत आहे, तसे त्यांने इंद्रजित सावंत यांना फोन करत बोलले. ते रेकॉर्ड व्हायरल झाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणारे वक्तव्ये त्याने केले आहेत. असीम सरोदे म्हणाले की, कोरटकरने सावंत यांना फोन करत जे वक्तव्य केले आहे ते जर पाहिले तर भयानक स्वरुपाचे आहेत, तरी अर्ध्या तासात त्याला अटकपूर्व जामीन मिळतो कसा? सरकारनेदेखील अर्ज केला होता की त्याचा जामीन रद्द करा. ज्या अटींवर त्याला जामीन मिळाला होता त्यातील अनेक गोष्टीचे त्याने पालन केल नाही म्हणून त्याचा जामीन रद्द करण्यात यावा. कोल्हापूरच्या पोलिस स्टेशनला हजर होणे ही त्यातील पहिली अट होती पण कोरटकर हजर झाला नाही. तर दुसरी अट होती की पोलिस स्टेशनला मोबाईल जमा करावा पण त्याने पत्नीच्या हाती मोबाइल पाठवला. नेमके प्रकरण काय? छावा चित्रपटाविरोधात भाष्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर नामक एका व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. सावंत यांनी स्वतः या प्रकरणी एक ऑडिओ क्लिप सार्वजनिक केली आहे. मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाचा एक परशूरामी ब्राxx धमक्या देत आहे. मला अशा धमक्या नवीन नाहीत. पण या लोकांच्या मनात शिवाजी महाराजांविषयी किती विष भरलेले आहे हे झोपलेल्या मराठा बहुजनांना समजावे म्हणून मी ही रेकॉर्डिंग व्हायरल करत आहे, असे सावंत यांनी म्हटले होते. इंद्रजित सावंत यांनी छावा चित्रपटाविषयी माध्यमांशी संवाद साधताना कथितपणे ब्राह्मणद्वेषी विचार मांडल्याचा आरोप आहे. या प्रकरणी प्रशांत कोरटकर नामक नागपूरच्या व्यक्तीने फोन करून त्यांना धमकी दिली आहे. इंद्रजीत सावंत यांनी स्वतः यासंबंधीची ऑडिओ क्लिप जाहीर करत तसा दावा केला आहे. त्यानंतर या प्ररकणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share