माझे वय 60, त्यामुळे विधानसभा लढायची नाही:भाजप आमदाराचे वाढदिवशी निवृत्तीचे संकेत, पण लोकसभा लढवण्याची व्यक्त केली इच्छा
भाजपचे ज्येष्ठ नेते बबनराव लोणीकर यांनी आपल्या वाढदिवसादिवशी मोठी घोषणा केली आहे. परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी या घोषणेतून त्यांच्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत. माझे वय आता 60 वर्षे झालेले आहे, त्यामुळे मी आता निवृत्तीच्या दिशेने आहे. त्यामुळे यापुढे विधानसभा लढायची नाही, असे बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे. मात्र, आपली लोकसभा निवडणूक लढवण्याचीही इच्छा असल्याचेही ते म्हणाले. वाढदिवशी रिटायरमेंटची भाषा आणि दुसरीकडे लोकसभा लढवण्याची इच्छा जाहीर करणे म्हणजे नेमके बबनराव लोणीकर यांना राजकारणातून निवृत्त व्हायचे आहे की मग लोकसभा लढवून प्रमोशन घ्यायचे आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. नेमके काय म्हणाले बबनराव लोणीकर?
आज बबनराव लोणीकर यांचा वाढदिवस असून, आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या भविष्यातील राजकीय वाटचालीसंदर्भात मोठी घोषणा केली. माझे वय आता 60 वर्षे झाले आहे, त्यामुळे मी निवृत्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. यापुढे विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी निवडणुकीपासून माघार घेण्याचा निर्णय घेतला. मात्र दुसरीकडे साधू संतांच्या आशीर्वादाने आणि पक्षाने जर संधी दिली तर लोकसभा निवडणूक एकदा लढवण्याची इच्छा आहे. असे म्हणत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले आहेत. लोणीकर यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजप लोणीकरांना लोकसभेची उमेदवारी देणार का?
बबनराव लोणीकर हे भाजपच्या मराठवाड्यातील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक मानले जातात. ते परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेले आहेत. 2014-19 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात राज्याचे पाणीपुरवठा व जालन्याचे पालकमंत्री देखील राहिलेले आहेत. त्यांच्या प्रभावामुळे या भागात भाजपला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांची लोकसभेतील उमेदवारी पक्ष देणार का? हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. लोणीकर यांना मंत्रिपदाची हुलकावणी
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बबनराव लोणीकर परतूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. घेऊन 4 हजार 740 मतांनी महाविकास आघाडीचे आसाराम बोराडे यांचा पराभव केला. त्यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवून विजयाची हॅट्रिक मारली. त्यांना 70 हजार 659 मते मिळाली होती. या विजयानंतर लोणीकर यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. त्यांना पदाची अपेक्षा होती. याबाबत त्यांनी एकदा बोलूनही दाखवले होते. मी मराठवाड्यात सर्वात सिनियर आमदार आहे. मी 40 वर्षांत शंभर रुपयाचाही अपहार केला नाही. इतकी वर्षे निष्कलंक राहणे ही साधी गोष्ट नाही. त्यामुळे मला मंत्रिपदाची संधी मिळावी, असे ते म्हणाले होते. मात्र, त्यांना यंदा मंत्रिपद काही मिळाले नाही.