आपण तरी देशाच्या जनतेची दिशाभूल करू नका:शरद पवारांच्या मतांच्या शंकेवर फडणवीसांनी दिले आकडेवारीत उत्तर

महाराष्ट्रात ठिकठिकाणी महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण होते. पण निकाल अनुकूल लागला नाही. हे संशयास्पद असल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी महायुतीला मिळालेल्या मतांच्या आकडेवारीवर देखील भाष्य करत प्रश्न उपस्थित केला आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जनतेची दिशाभूल करू नका, असा सल्ला फडणवीस यांनी दिला आहे. शरद पवारांच्या विधानावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवार साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका. जास्त मते मिळूनही कमी जागा कशा? चला 2024 लोकसभेत काय झाले ते पाहू, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीच सांगितली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, 2024 च्या लोकसभेत भाजपाला मते 1,49,13,914 आणि जागा 9, पण काँग्रेसला मते 96,41,856 आणि जागा 13. शिवसेनेला 73,77,674 मते आणि 7 जागा, तर राष्ट्रवादी-शरद पवार गटाला 58,51,166 मते आणि 8 जागा. 2019 च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला 87,92,237 मते होती आणि 1 जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला 83,87,363 मते होती आणि जागा 4 आल्या. पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल! तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा आहे, असे म्हणत टोला देखील लगावला आहे. काय म्हणाले होते शरद पवार?
पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात एक उत्साहाचे वातावरण असते. पण महाराष्ट्रात तसे वातावरण दिसत नाही. पण उगीचच आरोप करणे योग्य नाही. माझ्याकडे यासंबंधी अधिकृत अशी माहिती नाही. आम्ही केवळ काही आकडेवारी गोळा केली. त्यात निवडणूक लढवणाऱ्या राजकीय पक्षांना मते किती पडली? व त्यांचे किती जण निवडून आले? हे पडताळून पाहिले. त्यात काँग्रेसला 80 लाख मते पडली. पण त्यांची केवळ 15 उमेदवार निवडून आले. याऊलट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला काँग्रेसहून 1 लाख कमी म्हणजे 79 लाख मते पडली. पण त्यांचे तबब्ल 57 उमेदवार निवडून आले. म्हणजे 80 लाख वाल्यांचे 15 व 79 लाख वाल्यांचे 57. दुसरीकडे, आम्हाला म्हणजे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला 72 लाख मते पडली. आमचे उमेदवार निवडून आले 10. याऊलट अजित पवार गटाला 58 लाख मते पडली. पण त्यांचे 41 उमेदवार निवडून आले. म्हणजे 72 लाख वाल्यांचे 10 आणि 58 लाख वाल्यांचे 41 उमेदवार निवडून आले. यात काहीतरी चूक आहे. हातात काहीतरी ठोस आधार असेपर्यंत त्यावर बोलणे योग्य नाही. पण मतांचे आकडे आश्चर्यकारक आहेत, असे शरद पवार म्हणाले. महाविकास आघाडीचा निर्णय म्हणजे लोकशाहीचा अपमान:निवडून देणाऱ्या जनतेचाही अपमान; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथ न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा निर्णय म्हणजे लोकशाहीचा अपमान असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ज्या जनतेने त्यांना निवडून दिले, त्याच जनतेचा देखील हा अपमान असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीने घेतलेल्या भूमिकेवर टीका केली आहे.​​​​​​​ हेही वाचा

Share